नेत्यांच्या बेरीज–वजाबाकीत इच्छुकांचा जीव हैराण
। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे । दि. 14 नोव्हेंबर 2025 ।
फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला आता हातभरच वेळ उरला आहे. पहिले पाच दिवस तर एकही अर्ज पडला नाही, त्यामुळे इच्छुकांनी अक्षरशः दुविधेत दिवस काढले. वरून नेत्यांची बेरीज–वजाबाकी चालू असल्याने कोणालाच अजून ग्रीन सिग्नल मिळत नाही, म्हणून अनेकांचा जीव टांगणीला लागल्यासारखं वातावरण आहे.
सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन अर्ज स्विकारत आहे. उद्यापासून अर्जांचा ओघ वाढेल अशी चर्चा शहरभर आहे. 13 प्रभागांमधील 27 जागा आणि लोकनियुक्त नगराध्यक्षपद अशी मोठी निवडणूक मतदारांसमोर आहे. पण खासदार गट, राजे गट की इतर गट—कोणाच्याही नावांचे अधिकृत खुलासे अजून झालेले नाहीत. त्यामुळे निवडणूक दोन गटांत होणार की तीन गटांमध्ये? हे कोडे पुढच्या दोन दिवसांतच उलगडेल.
नगराध्यक्षपदाचा पेच कायम
नगराध्यक्षपद खुले असलं तरी शहरातील राजकारण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललं आहे. राजे गटातील काही जणांनी खासदार गटात प्रवेश केल्याने राजे गटाचा अधिकृत उमेदवार जाहीर व्हायलाच तयार नाही. दुसरीकडे खासदार गटातही माजी विरोधीपक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा चेहरा पुढे येईल की माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्यावर मोहर उमटेल? हे स्पष्ट झालेलं नाही. यामुळे नगरायक्षपदाच्या उमेदवारीचा पेच दोन्ही गटाकडून कसा सोडवला जाणार? हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अन्य गटांची उघडी नजर
शहरातील हे दोन प्रमुख गट आपापली बेरीज–वजाबाकी करत असताना इतर पक्ष आणि आघाड्या मात्र कानावर हात ठेवून शांतपणे पाहत बसल्या आहेत. प्रमुख गटांतील नाराज कोण आणि किती? यावर इतर गटांचीही नजर रोखलेली आहे, अशा चर्चांना जोर चढला आहे.
