| लोकजागर | फलटण | दिनांक ४ डिसेंबर २०२५ |
फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीतील शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी शंकर मार्केट परिसरातील आणि फलटण शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे अभिवचन दिले आहे. आगामी काळात व्यापाऱ्यांचे प्रश्न आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी निश्चितच ठोस काम करून दाखवेन, असे त्यांनी सांगितले.
शहरातील शंकर मार्केट परिसरातील एका चहाच्या टपरीवर श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी परिसरातील व्यापाऱ्यांसमवेत चहाचा आस्वाद घेतला आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.
यावेळी उपस्थित असलेल्या व्यापाऱ्यांनी शहरातील छोट्या-मोठ्या समस्या, भविष्यात आवश्यक असणाऱ्या सुविधा यांसह विविध विषयांवर श्रीमंत अनिकेत राजे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या. सर्वसामान्यांमध्ये मोकळ्या मनाने रमलेले श्रीमंत अनिकेत राजे उपस्थित लोकांना विशेषत्वाने भावले.

याप्रसंगी शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किशोर सिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत अनिकेत राजे यांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ व्यापारी नागरिक, छोटे-मोठे विक्रेते, युवा कार्यकर्ते यांच्यासह प्रभाग क्रमांक चारचे शिवसेना उमेदवार पप्पू शेख, प्रभाग आठचे शिवसेना उमेदवार विशाल तेली आदींची उपस्थिती होती.
