लोकजागर, काळज, दि. ८ डिसेंबर २०२५ (वसीम इनामदार) : काळज येथे फलटण आगाराच्या सर्व एसटी बस थांबाव्यात या मागणीसाठी काळज गावचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन गाढवे पाटील यांनी दहा महिन्यांपूर्वी काळज ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तसेच आमदार सचिन पाटील यांचे निवेदन फलटण एसटी विभागाकडे सादर केले होते. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही आजपर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने ही बाब स्थानिकांमध्ये नाराजीचा विषय ठरत आहे.
पुणे–पंढरपूर हायवेलगत वसलेल्या काळज गावासह तडवळे, डोंबाळवाडी, घाडगे मळा, नांदल, मुरूम या परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, शेतकरी, महिला, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिक दैनंदिन प्रवासासाठी लोणंद व फलटण येथे जात असतात. बाजार, आरोग्यसेवा तसेच रोजगारानिमित्त पुणे, मुंबई, सातारा व इतर ठिकाणांसाठी येथूनच प्रवास होतो. वाढती लोकसंख्या व दवाखाने-बाजारपेठ यांच्यासाठी प्रवासाची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असतानाही बस थांबा न मिळाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या दुर्लक्षामुळे काळज व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये एसटी विभागाबद्दल नाराजीचा सुर वाढत आहे. प्रस्ताव असूनही आणि वारंवार विनंती करूनही बस थांबा मंजूर न झाल्याने सामान्य प्रवाशांना अनेक वर्षांपासून सहन करावी लागणारी गैरसोय दूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आंदोलनाचा इशारा
काळज गावचे माजी उपसरपंच श्री. सचिन गाढवे पाटील यांनी एसटी विभागाने तातडीने याबाबत सकारात्मक तोडगा काढून फलटण आगाराच्या सर्व गाड्या काळज येथे थांबविण्यास अनुमती द्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. ही मागणी पुढील आठ दिवसांत मान्य न झाल्यास काळज व पंचक्रोशीतील गावांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
