‘माझी चौकशी आता रामराजेंनीच करावी’; डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान

| लोकजागर | फलटण | दि. १९ डिसेंबर २०२५ |

“डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणात माझा दुरान्वये संबंध नसल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. असे असतानाही रामराजे नाईक निंबाळकर वारंवार माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांचा जर मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर आणि यंत्रणेवर विश्वास नसेल, तर आता रामराजेंनीच स्वतः माझी चौकशी करावी. मी आजच रात्री नऊ वाजता त्यांची गजानन चौकात वाट बघत आहे,” अशा शब्दांत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांना जाहीर आव्हान दिले.

रामराजेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रणजितसिंह यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत रामराजेंच्या राजकारणाचे वाभाडे काढले.

पाया पडलो नाही, उलट तेच ‘मनोमिलना’साठी आले होते
रामराजेंनी केलेल्या ‘पाया पडल्याच्या’ आरोपाचा समाचार घेताना रणजितसिंह म्हणाले की, “मी खासदारकीच्या वेळी कधीही त्यांच्या पाया पडलेलो नाही. उलट, केवळ दोन महिन्यांपूर्वी रामराजे स्वतःच आमच्याकडे मनोमिलनासाठी मागे लागले होते. आता निवडणूक समोर पाहून ते सोयीस्करपणे दहशतीचा मुद्दा काढत आहेत. प्रत्यक्षात त्यांनीच नगरपालिकेच्या निवडणुकीत गुंडांना तिकिटे दिली आहेत.”

भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही
रामराजेंच्या भ्रष्टाचाराबाबत बोलताना रणजितसिंह यांनी गंभीर आरोप केले. “लवासा प्रकल्प आणि आशीर्वाद सोसायटी प्रकरणात रामराजेंनी शासनाची कशी फसवणूक केली, याचे सर्व पुरावे आणि कागदपत्रे आमच्याकडे आहेत. तरीही आम्ही त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आम्हाला कोणाला तुरुंगात बसवायची हाव नाही, मात्र जनतेसमोर त्यांचे खरे स्वरूप येणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

विकासाचे दावे आणि अनिकेतराजेंवर रणजितदादांची टीका
कर्तबगारी शून्य: अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची स्वतःची कर्तबगारी शून्य आहे. तरीही खोटं रेटून बोलून रामराजेंना त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे. पण यावेळी अनिकेतराजेंचे डिपॉझिट जप्त होईल आणि समशेर दादा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

पाणी प्रश्न: धोम-बलकवडीच्या पाण्याशी रामराजेंचा कोणताही संबंध नाही. तसेच, त्यांनी कधीही इतर कारखान्यांना मदत केली नाही.

MIDC चा अडथळा: आम्ही कधीही ‘कमिन्स’ बंद पाडण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, नाईक बोमवाडी एमआयडीसी होऊ नये, यासाठी रामराजेंनीच प्रयत्न केले होते.

“आमच्या कारखान्याने तालुक्यात उच्चांकी दर दिला आहे, म्हणूनच शेतकरी आमच्यावर विश्वास ठेवतात. रामराजेंनी आता आपली पुढची पावले जपून टाकावीत, कारण फलटणची जनता आता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही,” असा इशाराही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेवटी दिला.

Spread the love