नगरपालिका निवडणुकांत राष्ट्रवादीचा ‘घड्याळ’ गजर! थेट ३८ नगराध्यक्ष आणि ११०० नगरसेवकांसह घवघवीत यश

। लोकजागर । मुंबई । दि. २३ डिसेंबर २०२५ ।

नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात पक्षाच्या घड्याळ चिन्हावर ३८ नगराध्यक्ष आणि तब्बल १ हजार १०० नगरसेवक निवडून आले असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘स्ट्राइक रेट’ अत्यंत प्रभावी राहिला असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

राज्यातील ३ हजार ६८१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार उभे केले होते. त्यापैकी १,०९० (जवळपास ११००) जागांवर पक्षाला स्पष्ट विजय मिळाला आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे, तर काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली होती. “स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून निवडून आलेले नगरसेवक या अधिकृत आकडेवारीत धरलेले नाहीत, तरीही पक्षाला मिळालेला प्रतिसाद हा उत्साहवर्धक आहे,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

अजितदादांच्या नेतृत्वाखालील टीमवर्कला यश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि मंत्रिमंडळातील सहकारी तसेच स्टार प्रचारकांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे हे यश मिळाल्याचे तटकरे म्हणाले. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणुका होत असल्याने जनतेत मोठे औत्सुक्य होते. जनतेची ही नाराजी दूर करत त्यांना विकासकामांच्या माध्यमातून साद घालण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरली आहे.

पुढचे लक्ष जिल्हा परिषद आणि महापालिका नगरपालिकांच्या यशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. “पक्षाने सामुदायिक मेहनत आणि टीमवर्कच्या जोरावर हे यश मिळवले आहे, आता हेच नियोजन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक-शेख, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, सुरज चव्हाण आणि लतिफ तांबोळी उपस्थित होते.

Spread the love