। लोकजागर । फलटण । दि. २३ डिसेंबर २०२५ ।
फलटण शहरातील गजबजलेल्या शुक्रवार पेठ आणि मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांची महत्त्वाची सोय असलेली पोस्ट ऑफिसेस बंद करण्याच्या हालचाली सुरू होताच, नवनियुक्त नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी जनहितासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “काहीही झाले तरी आपल्या प्रभागातील आणि शहरातील महत्त्वाची पोस्ट ऑफिसेस बंद होऊ देणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, विजयानंतर लगेचच कामाचा धडाका लावल्याने नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
शुक्रवार पेठ आणि मार्केट यार्ड ही फलटणची व्यापारी व निवासी केंद्रे आहेत. येथील पोस्ट ऑफिस बंद झाल्यास ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होईल, ही बाब ओळखून सिद्धाली शहा यांनी तातडीने सूत्रे हलवली. भाजप नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आमदार सचिन पाटील यांची भेट घेतली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी त्वरित पुणे रिजनच्या मुख्य पोस्ट प्रबंधकांसाठी (Chief Postmaster General) शिफारस पत्र दिले.
हे पत्र घेऊन सिद्धाली शहा यांनी पुणे पोस्ट विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला आणि आपली मागणी लावून धरली. “ही कार्यालये या परिसरातील दैनंदिन व्यवहाराचा कणा आहेत. ती बंद झाल्यास नागरिकांना मुख्य पोस्ट ऑफिससाठी हेलपाटे मारावे लागतील, जे कधीही खपवून घेतले जाणार नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. यावेळी आमदार सचिन पाटील यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा देत, प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे.
राज्यातील सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान मिळवलेल्या सिद्धाली शहा यांनी विजयाच्या जल्लोषात न रमता, दुसऱ्याच दिवशी जनतेच्या प्रश्नासाठी मैदानात उतरून आपल्या कामाची पोचपावती दिली आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे शुक्रवार पेठ आणि मार्केट यार्डमधील पोस्ट सेवा सुरक्षित राहण्याची चिन्हे असून, “आम्ही दिलेल्या शब्दाला जागणारे लोक आहोत,” या शब्दांत त्यांनी आपला विकासकामांचा संकल्प पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे.
