। लोकजागर । काळज (फलटण) । वसीम इनामदार । दि. २४ डिसेंबर २०२५ ।
साखरवाडी येथील साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने बडेखान-साखरवाडी या रस्त्यावर ऊस वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अक्षरशः रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास बडेखान येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
साखरवाडी कारखान्याकडे जाणारे शेकडो ऊस वाहतूक ट्रॅक्टर, ट्रॉली आणि अवजड वाहने याच रस्त्यावरून दिवस-रात्र धावत असतात. रस्ता मुळातच अरुंद (सिंगल) असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना मोठी कसरत करावी लागते. यातच रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने ऊसाचे ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी अनेक प्रवाशांना या रस्त्यावरील अपघातात आपला जीव गमवावा लागला असून, अजून एखादा निष्पाप बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या रस्त्याचा वापर केवळ ऊस वाहतुकीसाठीच नाही, तर नांदल, घाडगेमळा, काळज, तडवळे आणि खराडेवाडी येथील शालेय विद्यार्थी, शेतकरी व फलटण एमआयडीसीमध्ये जाणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात करतात. तसेच बारामती, लोणंद, फलटण, पुणे आणि सातारा येथे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. रस्त्याची लेव्हल बिघडल्याने दुचाकीस्वारांचे अपघात नित्यनेमीचे झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने मुरुम टाकून साईड पट्ट्या भराव्यात आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
साखरवाडी, खामगाव, मुरूम, खराडेवाडी, तडवळे, काळज आणि नांदल येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू केले नाही, तर बडेखान फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी दिला आहे.
