। लोकजागर । सातारा / मुंबई । दि. २४ डिसेंबर २०२५ ।
साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज (दि. २४) संयोजन समितीच्या वतीने अधिकृत निमंत्रण देण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सावळ्या साताऱ्याचे निमंत्रण दिले.
महाराष्ट्र साहित्य परिषद (शाहूपुरी शाखा) आणि मावळा फाऊंडेशन यांच्या वतीने १ ते ४ जानेवारी २०२६ या काळात शाहू स्टेडियमवर हे संमेलन पार पडणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून, समारोप सोहळ्याला ज्ञानपीठ विजेते रघुवीर चौधरी उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी साताऱ्यात अत्यंत जय्यत सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करत, “संमेलनाची तयारी उत्तम सुरू असल्याने हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल,” असा विश्वास व्यक्त केला आणि आयोजकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई, भरत गोगावले, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निमंत्रित केले.
स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले की, साताऱ्यात तब्बल ३३ वर्षांनंतर हा साहित्यिक सोहळा होत असल्याने सातारकरांमध्ये मोठा उत्साह आहे. देश-विदेशातून येणाऱ्या साहित्यप्रेमींना साताऱ्यात उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी महामंडळ आणि संयोजक संस्था विशेष प्रयत्न करत आहेत. याप्रसंगी महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.
