डेक्कन चौकातील अतिक्रमण हटविण्यासाठी सात दिवसांचा ‘अल्टीमेटम’!

। लोकजागर वृत्त । फलटण । २० नोव्हेंबर २०२६ ।

फलटण शहरातील अत्यंत गजबजलेल्या डेक्कन चौक येथील उपळेकर मंदिरासमोरील रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच ऐरणीवर आला आहे. या बेकायदा अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यासाठी फलटण नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाचे पथक दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारण्यापूर्वीच संबंधित जागामालकांनी आपले आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता नगरपरिषद प्रशासनाकडे सात दिवसांची लेखी मुदत मागितल्याने या कारवाईला तूर्तास सात दिवसांची मुदत मिळाली आहे.

डेक्कन चौक हा फलटण शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि सतत वर्दळीचा परिसर असून, उपळेकर मंदिरासमोरील रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. सार्वजनिक रस्त्यालगत अतिक्रमण झाल्यामुळे येथील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित ठिकाणी कठोर कारवाईसाठी ठोस पाऊल उचलले. नगरपरिषदेचे कर्मचारी व पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित जागामालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित जागामालकांनी स्वतःहून हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्याची लेखी विनंती प्रशासनाकडे केली असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागप्रमुख विनोद जाधव यांनी दिली.

आता या दिलेल्या सात दिवसांच्या मुदतीत संबंधित जागामालकांनी स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यास आणि ते अतिक्रमण तसेच कायम राहिल्यास, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोणतीही गय न करता थेट कठोर कायदेशीर आणि धडक कारवाई करण्यात येणार आहे. केवळ याच ठिकाणी नव्हे, तर भविष्यातही संपूर्ण फलटण शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सर्वच अतिक्रमणांवर अशीच धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा सणसणीत इशारा अतिक्रमण विभागप्रमुख विनोद जाधव यांनी दिला आहे.

Spread the love