‘स्वराज’चा नवा विक्रम ! सन २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी तब्बल ३,९११ रुपयांचा सर्वाधिक पहिला हप्ता जाहीर

। लोकजागर वृत्त । फलटण । १८ नोव्हेंबर २०२६ ।

सातारा जिल्ह्यातील साखर उद्योग क्षेत्रात आपला वेगळा आणि दबदबा निर्माण केलेल्या ‘स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड’ (फलटण) या कारखान्याने चालू हंगामासाठी उसाचा दर जाहीर करत शेतकऱ्यांना एक अत्यंत सुखद धक्का दिला आहे. सन २०२६-२७ च्या चालू गाळप हंगामासाठी सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन तब्बल ३,९११ (तीन हजार नऊशे अकरा) रुपये इतकी घसघशीत पहिली उचल देण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा कारखान्याच्या वतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘स्वराज’ने जाहीर केलेला हा दर सातारा जिल्ह्यातील संपूर्ण साखर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने, जिल्ह्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित संचालक तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा कारखान्याच्या संचालिका ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड’चे संचालक उदय पाटील याबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले की, “सध्या सुरू असलेल्या सन २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या सातारा जिल्ह्यातील उसाला प्रति मेट्रिक टन ३,९११ रुपये इतकी पहिली उचल त्वरित अदा करण्यात येणार आहे. तसेच, या हंगामात उत्पादित होणाऱ्या साखरेला बाजारात मिळणारा एकूण सरासरी विक्री दर आणि कारखान्याची सद्यस्थितीतील आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय असलेल्या पुढील अंतिम बिलाबाबत अत्यंत योग्य तो आणि शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल. नुकतेच ‘स्वराज’ कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड’ देखील प्राप्त झाला आहे. कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे आणि रणजितदादांच्या दूरगामी दूरदृष्टीमुळे ‘स्वराज’ने आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बळ देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. सातारा जिल्हा बँकेवर नुकतेच बिनविरोध संचालक म्हणून धडक मारलेल्या रणजितदादांनी, आता जिल्ह्याच्या साखर पट्ट्यातही सर्वाधिक दर जाहीर करत पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ‘स्वराज’च्या या धडाकेबाज व ऐतिहासिक घोषणेमुळे फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.”

Spread the love