९ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचा (रानडे इन्स्टिट्यूट) माजी विद्यार्थी मेळावा

। लोकजागर । पुणे । दि. 0५ फेब्रुवारी २०२५ ।

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचा (रानडे इन्स्टिट्यूट) माजी विद्यार्थी मेळावा येत्या ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी (रविवार) आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रानडे इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख आणि शिक्षक यांच्याकडून देण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती देताना सांगण्यात आले की, पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण देणारी एक ख्यातनाम संस्था म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग (अर्थात रानडे इन्स्टिट्यूट) ओळखला जातो. या विभागातून पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घेऊन पत्रकारिता व माध्यमांच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविलेले अनेक पत्रकार राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. तसेच, माध्यमांशी संलग्न इतर अनेक क्षेत्रांमध्येही या विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविलेला आहे.

विभागाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याद्वारे अशा सर्वच विद्यार्थ्यांना ते विभागाचे विद्यार्थी असतानाच्या काळातील आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळते. त्यामुळे विभागाने येत्या रविवारी, ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले आहे. डेक्कन परिसरातील रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारामध्ये सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हा स्नेहमेळावा होणार आहे. विभागाचे आजी- माजी विद्यार्थी, विभागातील माजी प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग तसेच विभागावर सातत्याने प्रेम करणाऱ्या पुणेकरांना या मेळाव्यामध्ये एकमेकांशी संवाद साधता येईल. विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love