‘गोविंद’ च्या व्यवहारात कोणतीही तफावत नाही : श्रीमंत संजीवराजे

प्राप्तिकर विभागाची कारवाई संपल्यानंतर आपल्या ‘सरोज व्हिला’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर.

अखेर कोणत्याही कारवाईविना प्राप्तिकर विभागाची बहुचर्चित तपासणी संपली

। लोकजागर । फलटण । दि. ०९ फेब्रुवारी २०२५ ।

‘‘‘गोविंद मिल्क’ च्या व्यवहारात कोणतीही तफावत आढळलेली नाही. तपासादरम्यान संबंधित विभागाकडून कोणतही अनूचित वागणं – बोलणं झालेलं नाही. आपल्याविरोधात कोणतीही जप्तीची अथवा खाती गोठवण्याची कारवाई झालेली नाही. डेअरीचं कामकाज अत्यंत समाधानकारक असल्याचं त्यांना दिसून आलं आहे’’, अशी माहिती ‘गोविंद मिल्क’ चे प्रमुख श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानी अचानक प्राप्तिकर विभागाची धाड पडली होती. तेव्हापासून काल दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ अखेर सलग ५ दिवस ही तपासणीची प्रक्रिया सुरु होती. सरतेशेवटी या तपासणीच्या कारवाईला काल रात्री पूर्णविराम मिळाला. त्यानंतर श्रीमंत संजीवराजे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वरील माहिती दिली. यावेळी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, ‘‘गोविंद मिल्क कंपनीच्या संबधीत ही तपासणी होती. तपासणीवेळी आम्ही त्यांना सहकार्य केलं; त्यांनीही आम्हाला कोणतीही चूकीची वागणूक दिली नाही. तपासणीवेळी जेव्हा ते आले तेव्हा माझ्याकडे असलेली २ लाख ३५ हजार रुपयांची रोकड आणि घरातील दागिनेही त्यांनी जाताना परत दिले. संबंधित विभागाकडून तपासणीनंतर आपल्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. ही तपासणीची कारवाई राजकीय होती की नव्हती हे काही मी सांगू शकत नाही.’’, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

गेल्या ५ दिवसांपासून कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या समर्थनाबद्दल श्रीमंत संजीवराजे यांनी सर्वांचे आभार देखील मानले.

डेअरीच्या कामकाजाचं अधिकार्‍यांकडून कौतुक : श्रीमंत सौ. शिवांजलीराजे

दरम्यान, अधिकृतरित्या कारवाई संपण्याच्या काहीवेळ आधी श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘‘प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी डेअरीचं कामकाज बघून कौतुक केलं आहे. शिवाय ज्यांच्यावर अशी रेड पडते आणि त्यांच्या कंपन्या चांगल्या असतात त्यांची व्यवसायाची दुप्पटीने वाढ होते, असेही म्हणणे त्या अधिकार्‍यांनी मांडले, ही आनंदाची बाब आहे. ’’, असे सांगून ‘‘४० लोकांची त्यांची टीम होती. त्या सर्वांचेही आपण आभार मानले आहेत’’, असेही श्रीमंत शिवांजलीराजे यांनी सांगितले.

दरम्यान, सदरची कारवाई संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या नावाचा जयघोष करत जल्लोष व्यक्त केला.

Spread the love