आयकर विभागाच्या कारवाईला मिळणार राजकीय रंग?

आ.श्रीमंत रामराजेंच्या ‘स्टेटस’ मुळे चर्चा; राजकारणाचा संबंध नसल्याचे रणजितदादांकडून यापूर्वीच अधोरेखित

। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे । दि. १० फेब्रुवारी २०२५ ।

‘गोविंद मिल्क’ कंपनीचे सर्वेसर्वा तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर झालेल्या प्राप्तिकर विभागाच्या कारवाईला आगामी काळात राजकीय रंग मिळणार कां? अशी चर्चा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सोशल मिडीयावरील ‘‘सुरुवात तुम्ही केली आहे; शेवट मी करणारच’’ या ‘व्हॉटस्अ‍ॅप’ स्टेटसमुळे सुरु झाली आहे तर कारवाईच्या संबंधाने विविध माध्यमांमधून दिलेल्या मुलाखतीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या कारवाईमागे कोणतेही राजकारण नसल्याचे यापूर्वीच अधोरेखित केले आहे.

दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. कारवाई सुरु झाल्यानंतर श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून ‘‘गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या; काळजी नसावी !’’, असा संदेश सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिला होता. मात्र काल रात्री (दि. 9) तपासणीची कारवाई संपल्यानंतर आज (दि.10) रोजी सकाळी ‘‘सुरुवात तुम्ही केली आहे; शेवट मी करणारच’’, असा संदेश आ. श्रीमंत रामराजे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिल्याने हा राजकीय इशारा असल्याचे मानून आगामी काळात या बहुचर्चित कारवाईला राजकीय रंग मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, सदरची तपासणी सुरु असताना विविध माध्यम प्रतिनिधींनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या कारवाईमागे राजकारणाचा भाग आहे कां? असे विचारले असता, ‘‘डेअरी उद्योगासंबंधीची ही कारवाई आहे. एकाचवेळी राज्यातील इंदापूर, नागपूर अशा ठिकाणीही अशी कारवाई सुरु आहे. आपल्यावरही अशी कारवाई यापूर्वी झालेली होती. विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्या बंधूंवरही अशी कारवाई गेल्या काही दिवसांपूर्वीच झालेली आहे. त्यामुळे या कारवाईशी राजकारणाचा कसलाही संबंध नाही’’, असे त्यांनी यापूर्वीच अधोरेखित केले आहे.

सदरहू तपासणी सुरु असताना ही कारवाई राजकीय आकसातून असल्याची शक्यता राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती. आता खुद्द आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय इशारा देणारा संदेश दिल्याने फलटणच्या राजकीय पटलावर आगामी काळात या मुद्दावर राजकारण कसे तापणार याबाबत विविध तर्क – वितर्क काढले जात आहेत.

Spread the love