फलटण परिसरातील लघुपट दिग्दर्शकांच्या शॉर्टफिल्मस् दर महिन्यात प्रदर्शित करून त्यावर चर्चा घडवून आणण्याचा मानस
। लोकजागर । ९ सर्कल, साखरवाडी । दि. १० फेब्रुवारी २०२५ ।
येथील कलाप्रेमी युवकांनी एकत्र येवून शनिवार दि. ८ फेवृवारी २०२५ रोजी सायंकाळी ‘सारांश फिल्म क्लब’ ची स्थापना केली. या प्रसंगी ख्यातनाम दिग्दर्शक सत्यजित रे यांची कृष्णधवल रंगात इ स १९६४ साली बनलेली ‘टू’ ही शॉर्टफिल्म प्रदर्शित करून त्यावर उपस्थित नागरिक आणि लहान मुले यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न क्लब मधील सभासदांनी केला. द्र्कश्राव्य माध्यमातून आपल्यापर्यंत येणाऱ्या कलाकृतींचा रसास्वाद घेण्यात येणाऱ्या अडचणी सोडविणे आणि कला, साहित्य, समाजभान ह्यांची जाणीव बाळगणारे नागरिक निर्माण करण्याचे ध्येय समोर बाळगले असल्याचे ‘सारांश फिल्म क्लब’चे स्वप्निल बनकर यांनी ह्याप्रसंगी सांगितले. फलटण परिसरातील लघुपट दिग्दर्शकांच्या शॉर्टफिल्मस् इथून पुढे दर महिन्यात प्रदर्शित करून त्यावर चर्चा घडवून आणण्याचा मानस त्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केला.
९ सर्कल मध्ये विविध प्रकारचे उपक्रम होत असतात, त्यात ह्या एका नव्या आणि वेगळ्या धाटणीच्या उपक्रमाची भर पडत असल्याचे समाधान कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मिलिंद पवार यांनी व्यक्त केले, तसेच अशा उपक्रमांना वेळोवेळी लागेल ती मदत आचारी संघ, हनुमान तरुण मंडळ यांच्या माध्यमातून केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. माजी सरपंच सुनील बनकर यांनीही यावेळी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या.
लघुपट आणि त्यावर चर्चा झालेनंतरच्या सत्रात सन १९७७ साली लोकप्रिय झालेल्या मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘अमर अकबर अँथनी’ ह्या चित्रपटाचे प्रदर्शन व त्यावर बातचीत असा कार्यक्रम फिल्म क्लब च्या सदस्यांनी आयोजित केला होता, त्यासही नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. एवढ्या जुन्या सिनेमाचे प्रायोजन काय? असा प्रश्न जेष्ठ नागरिकांनी उपस्थित केला असता सध्या सामाजिक वीण उसवू लागली असून द्वेषाचे वातावरण वाढीस लागले आहे, सोप्या भाषेत आपण एकाच आईची लेकरे आहोत असा संदेश देणारा हा करमणूकप्रधान चित्रपट त्यामुळे निवडला असे क्लबचे सदस्य सचिन मदने यांनी समारोपात स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील लघुपट निर्माते-दिग्दर्शकांनी आपल्या फिल्मस् वर बातचीत घडवून आणण्यासाठी फिल्मस् पाठवाव्यात, त्यासाठी ९९७०८३४३६१ ह्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रोहित मांढरे यांनी केले आहे.