। लोकजागर । फलटण । दि. १२ फेब्रुवारी २०२५ ।
माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा काल दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथे ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान संपन्न झाला. या कार्यक्रमात खा. शरद पवार यांनी केलेल्या ना. एकनाथ शिंदे यांच्या कौतुकावरुन सध्या राजकीय रान तापले आहे. मात्र खा. शरद पवार यांनी या भाषणावेळी मराठीतले सुप्रसिद्ध कवी पी. सावळाराम यांच्या संबंधीचा एक इंट्रेस्टिंग किस्सा सांगितला. हा वाचनीय किस्सा याप्रमाणे –

‘‘मराठीतले एक महत्वाचे कवी जे सातारकर होते त्यांचं नाव पी. सावळाराम. त्यांची काही गाणी ही खेड्यापाड्यात सुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला- मुलींचं लग्न लागलं की सनईवर किंवा रेकॉर्डवर एक गाणं यायचं ‘जा मुली जा, तु दिल्या घरी सुखी रहा’ वगैरे.. त्याचे कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष आणि सातारकर होते.
मला याची आठवण झाली त्याला एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, ग. दि. माडगूळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती. माडगूळकरांनी नाईक साहेबांना सांगितलं की, आमच्या सावळाराम पाटलाला अध्यक्ष करा. पक्षाचा सचिव म्हणून मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की ठाण्याला जायचं, दोन- तीन दिवस बसायचं आणि काहीही झालं तरी सावळाराम पाटील अध्यक्ष होतील हे बघायचं. आता मी काँग्रेसवालाच होतो, काय उद्योग करायचे ते माहित होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्याठिकाणी अध्यक्ष केलं. मी नाईक साहेबांना फोन केला की तुमचं काम झालंय. ते म्हटले त्यांना घेऊन या. कारण ही सूचना माडगूळकरांची होती आणि सुदैवाने माडगूळकर आज माझ्या घरी आहेत. मी सावळाराम पाटलांना बरोबर घेतलं आणि नाईक साहेबांच्या घरी ’वर्षा’वर गेलो. माडगूळकर यांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या पाठीवर थाप मारली. ’गड्या, मोठं काम केलं तु’.. ’येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला’..! सावळाराम पाटील यांच्या गावाचे नाव येडं मच्छिंद्र. त्यामुळे येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम तू केलं, म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं.’’