। लोकजागर । फलटण । दि. १३ फेब्रुवारी २०२५ ।
गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या तयारीत असणार्या एकास जेरबंद करण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश मिळाले आहे.
याबाबतची फलटण ग्रामीण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपल्या हद्दीत कोणत्याही अग्नी शस्त्राचा वापर होऊ नये म्हणून अशी अग्नी शस्त्र बाळगणार्या लोकांची गोपनीय माहिती काढून या प्रकारचे संभाव्य गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपी तपासबण्याबाबत सक्त आदेश दिलेले आहेत. या आदेशानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे याबाबत सतत माहिती काढत असते. दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय कल्लु बेनकर (रा. बावीस फाटा, गणेशशेरी, धुळदेव, ता. फलटण) हा मौजे विडणी गावचे हद्दीत फलटण ते पंढरपूर रोडवर बस स्टॉपजवळ उभा असून त्याच्याजवळ असलेले गावठी बनावटीचे फायर आर्म विक्री करण्याचा प्रयत्न करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर महाडीक यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जी. बी. बदने, पोलीस हवालदार नितीन चतुरे, पोलीस हवालदार वैभव सुर्यवंशी, पोलीस नाईक अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, कॉन्स्टेबर हणुमंत दडस, शिवराज जाधव यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.

सदर ठिकाणी पोलीस पथक गेल्यावर एक इसम संशयितरित्या वावरताना आढळून आला. त्याला पोलीसांची चाहूल लागल्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना श्रीनाथ कदम यांनी झडप मारुन संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे त्याच्या कमरेला असलेला गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस व एक रिकामी पुंगळी मिळून आली. सदर इसमास याबाबत विचारले असता भंगार काम करणार्या परप्रांतीय कामगाराकडून घेतलेली आहे असे त्यानी सांगितले.
दरम्यान, सदर प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी विरोधात यापूर्वी फलटण शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदरहू कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सुचनेनुसार करण्यात आली असल्याचे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.