विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्ष नेते पदी नियुक्ती
। लोकजागर । मुंबई । दि. १३ फेब्रुवारी २०२५ ।
राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे माजी आमदार तथा राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यवाह खा. के. सी. वेणूगोपाल यांनी जाहीर केले. तर मावळते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ पक्ष नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्त्वात झालेला बदल राज्यातील काँग्रेस पक्षाच्या उभारणीस कितपत लाभदायक ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ –
युवावस्थेपासूनच गाडगे महाराज,तुकडोजी महाराज व गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. तसेच ही एक फार मोठी उपलब्धी समजली जाते. शेतीस्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटीबध्द आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती, हे येथे विशेष उल्लेखनीय. तसेच २०१४ ते २०१९ या कालावधीत ते बुलढाणा विधान सभा मतदार संघात विधान सभा सदस्य म्हणून राहिले आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.

काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाब चे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधान सभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत.
एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.