। लोकजागर । अग्रलेख । दि. २५ फेब्रुवारी २०२५ ।
फलटण एस.टी. आगारात नव्याने १० एस.टी. बसेस काल प्रवाशांच्या सेवेत रुजू झालेल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाने फलटणसह राज्यभरातील विविध आगारांमध्ये अशा नवीन अत्याधुनिक बसेसचे वितरण केलेले आहे. या बसेसमध्ये आरामदायी बैठक व्यवस्था, मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या सार्वजनिक सुविधेचा वापर प्रवाशांकडून जबाबदारीने होणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून शासनाकडून प्रवासी वाहतुकीची सार्वजनिक सुविधा पुरवली जाते. राज्यभरात लाखो लोक दररोज या सुविधेचा वापर करीत असतात. लांब पल्ल्यापासून ते जवळच्या खेडो – पाड्यात जाताना अनेकांना या ‘लालपरी’ चा दैनंदिन जीवनात मोठा आधार असतो. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, मजूर अशा सर्वच घटकांना एकत्रित सामावून घेवून एस.टी. बसचा प्रवास सर्वदूर सुरु असतो. महामंडळाकडून प्रवासाची सुविधा पुरवली जाते मात्र प्रवाशांकडून या सुविधेचा वापर तितक्याशा जबाबदारीने होताना दिसत नाही; हे उघड वास्तव आहे.

या बसेसमध्ये केल्या जाणार्या बेजबादार वर्तनामध्ये पहिल्या क्रमांकावर अस्वच्छतेचा उल्लेख आपल्याला करता येईल. कोणतीही एस.टी. बस बघा; त्यामध्ये प्रवाशांकडून करण्यात आलेला कचरा हमखास आढळतो. प्रवासादरम्यान खाल्लेल्या खाद्यपदार्थांचे रॅपर्स, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदाचे तुकडे अशा गोष्टी अगदी मुक्तपणे बसमध्ये फेकून दिल्या जातात. याचबरोबर पान, तंबाखू, गुटखा (राज्यात विक्रीला बंदी असून देखील) खावून खिडकीच्या बाजूला थुंकणार्या व्यक्तीतर बसचा अंतर्बाह्य रंगच बदलून टाकतात. या प्रकारामुळे बसमध्ये होणारी घाण आणि कचरा प्रवासात हवे असणारे प्रसन्न वातावरण बिघडवून टाकतो.
प्रवासी वर्गाकडून सिटचे कुशन्स फाडणे, सिटची मागील बाजू खराब करणे, खिडक्यांची आदळ – आपट करणे, सिटच्या आर्मरेस्टची मोडतोड करणे, गर्दीच्यावेळी बसमध्ये जागा पकडताना दरवाजा सोडून खिडकीतून घुसखोरी करणे, गर्दीत चढताना बेशिस्तपणे धक्काबुक्की करणे, चालक, वाहक तसेच सहप्रवाशांसोबत वादविवाद घालणे असेही प्रकार अनेकदा एस. टी. प्रवासात होताना दिसत असतात. अशा प्रकारांमुळे एस. टी. ने प्रवास टाळणार्यांचीही संख्या मोठी आहे.
आता हे झाले प्रवाशांच्या बेजबाबदारपणाबद्दल. पण एस.टी.बसशी रोजचा संबंध येणार्यांमध्ये एस.टी. चालक आणि वाहक यांचाही समावेश आहेच. विशेषत: चालक वर्गाने एस. टी. बसेसची विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. वाहनाची सुरक्षितता डोक्यात ठेवून वाहन चालवल्यास सर्व काही हित साधेल हे अधिक विस्तृतपणे सांगण्याची गरज नाही. गत काही दिवसांपूर्वी एस.टी. महामंडळाच्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी एस.टी. कर्मचार्यांना उद्देशून दिलेला – ‘‘ एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचार्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम केले पाहिजे’’ हा कानमंत्र प्रत्येक कर्मचार्यांने अंगिकारल्यास एस.टी. ची वाटचाल अधिक दमदार होईल हे नक्की.
शेवटचा मुद्दा :
प्रवाशांमध्ये एस.टी. बस विषयी आपुलकी निर्माण होण्यासाठी मुळात ‘आपला आणि एस.टी. चा संबंध हा आजच्या प्रवासापुरता आहे’; ही मानसिकता बदलावी लागेल. प्रत्येक सार्वजनिक मालमत्तेवर जनतेचा सर्वाधिक हक्क असतो; त्यामुळे आपण ज्या प्रमाणे आपल्या खाजगी वाहनाची काळजी घेतो; त्याप्रमाणे प्रत्येक प्रवाशाने एस. टी. बसच्या बाबतीत ही मालमत्ता आपल्या मालकीची आहे हे ध्यानात घेवून तिची काळजी घेतली पाहिजे. असे घडल्यास कुणाकडूनही बेजबाबदार वर्तन घडून एस. टी. बसची नासधूस होणार नाही. यातून कुठल्याही मोर्चा, आंदोलनावेळी एस. टी. बसवर पडणारे दगडही थांबतील. प्रवाशांच्या मानसिकतेत हे सकारात्मक बदल घडवून आणण्याच्यादृष्टीने प्रत्येक बसस्थानकात, प्रवासादरम्यान जनजागृतीचे उपक्रम राबवण्याचेही प्रयत्न व्हावेत. या जनजागृतीचे चालक व वाहकांनाही प्रशिक्षण द्यावे व त्यांच्याकडूनही प्रवाशांना सोप्या आणि साध्या भाषेत योग्य ते मार्गदर्शन व्हावे. ठिकठिकाणी असणार्या प्रवासी संघटनांनीही यात पुढाकार घ्यावा. यातून एस.टी. बसचे आयुष्य वाढीस लागेल इतकेच.
रोहित वाकडे, संपादक, सा.लोकजागर, फलटण.