डॉ. बी. आर. आंबेडकर इन्स्टिट्यूटचा उपक्रम
। लोकजागर । फलटण । दि. २४ फेब्रुवारी २०२५ ।
फलटण येथील डॉ.बी.आर.आंबेडकर आय.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन संतोषगड या ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता करुन अनोखी शिवजयंती साजरी करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
फलटण पासून २५ कि. मी. अंतरावर असलेला संतोषगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून २९०० फूट उंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६३० मध्ये हा किल्ला बांधला. किल्ल्याला मुख्य ३ दरवाजे असून अंतर्गत एक गुप्त दरवाजा आहे. गोमुख स्थापत्य शैलीत बनविलेले आहेत. गडावर आजही विहिरीला पाणी आहे.
शिवजयंतीदिवशी डॉ.बी.आर.आंबेडकर आय.आय.टी.सेंटर पासून सर्व विद्यार्थी पायी चालत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आले. महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन हे विद्यार्थी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ताथवडा (ता.फलटण) गावात पोहोचल्यानंतर गावातील सरपंच, ग्रामसेवक व इतर ग्रामस्थ यांनी सर्वांचे स्वागत केले व या मोहिमेबद्दल त्यांचे कौतुक केले.

स्वच्छता मोहिमे दरम्यान संकलित केलेल्या कचर्याचे विघटन कोठे व कसे करायचे याची सर्वांना व्यवस्थित सूचना दिली. सुमारे २ तास गड चढून गेल्यानंतर विद्यार्थ्यांकडून गडावरील विविध ठिकाणची स्वच्छता करण्यात आली.
गड स्वच्छते दरम्यान गडावरील छोट्या शीळा एका बाजूला लावून, येणार्या जाणार्या लोकांना होणारा अडथळा दूर करण्याबरोबर ज्या ठिकाणी चढता येत नव्हते त्या ठिकाणी या शीळांच्या माध्यमातून पायर्या तयार करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. वाढलेली झाडेझुडपे काढून अनेक मार्ग मोकळे केले.
सारथी अंतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे यांचे मान्यता प्राप्त सेंटर डॉ. बी. आर.आंबेडकर आय.आय.टी. फलटण येथे कार्यान्वित असून त्याद्वारे मोफत प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी सरदार हिरोजी इंदलकर सारथी गडकिल्ले संवर्धन उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडा भारुड व स्वतःची मनोगते व्यक्त केली, तसेच सर्व महिला कर्मचार्यांनी मिळून बाल शिवबाचा पाळणा गायला.
शेखर कांबळे व सौ. मनीषा कांबळे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवराय आणि त्यांचे गड किल्ले याविषयी माहिती दिली.