। लोकजागर । फलटण । दि. २६ फेब्रुवारी २०२५ ।
महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण असतानाच अचानक पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात फलटणला येणार्या २६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समजताच सदर घटनेचा फलटणकरांकडून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्यावतीने सायंकाळी ७ वाजता शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात एकत्रित जमून या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
पुणे शहरातील सर्वात गजबजलेले ठिकाण म्हणून परिचित असलेल्या स्वारगेट बसस्थानकात पहाटेच्या वेळी फलटणला येण्यासाठी बसस्थानकात आलेल्या पिडीत तरुणीची दिशाभूल करुन शिवशाही बसमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याची माहिती विविध माध्यमांमधून धडकताच फलटण शहर हादरुन गेले. या घटनेचा सोशल मिडीयावर अनेकांकडून कडक शब्दात निषेध होत असून या घटनेतील नराधम आरोपीला पोलीसांनी पकडून फाशीची शिक्षा द्यावी या भावनेच्या प्रतिक्रिया फलटणकरांमधून उमटत आहेत. काही जणांकडून महिलांच्या सुरक्षेच्या समस्येवर बोट ठेवले जात आहे तर काही जण सुरक्षा यंत्रणा केवळ राजकीय नेते आणि अधिकार्यांच्या सेवेत असते; जनतेच्या रक्षणासाठी नसते अशी टिका करत आहेत. स्वारगेटसारख्या गजबजलेल्या ठिकाणी महिला सुरक्षित राहू शकत नसेल तर ही फार मोठी धोक्याची घंटा आहे, असेही मत अनेकजण व्यक्त करत आहेत.

दरम्यान, सी.सी.टी.व्ही.कॅमेर्यांच्या मदतीने आरोपीची ओळख पटली असून तो सराईत गुन्हेगार दत्तात्रय रामदास गाडे हा असल्याची माहिती पुणे पोलीसांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीसांची पथके त्याचा कसून शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपीला तात्काळ अटक करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
‘‘पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो. पीडित बहिणीला न्याय, मानसिक आधार, सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत’’, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.