| लोकजागर | फलटण | दि. २७ फेब्रुवारी २०२५ |
सारथी संस्था आणि एमकेसीएल संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जाणारा सारथी कोर्स अंतर्गत ‘सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रम २०२५’ नर्मदा कॉम्प्युटर्स लोणंद या संस्थेच्या वतीने किल्ले प्रतापगड येथे राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत किल्ल्याचे संवर्धन आणि स्वच्छता करण्याचे कार्य करण्यात आले. या मोहिमेत एकूण २६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका निगडे यांनी केले. तसेच या उपक्रमासाठी एसबीयु श्री. पराग, जिल्हा समन्वयक विक्रम सर (कराड) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची असलेली आस्था मोठ्या प्रमाणात दिसून आली. आपला किल्ला स्वच्छ व सुंदर असावा ही एकच भावना मनामध्ये ठेवून सर्व विद्यार्थ्यांनी प्रतापगडाच्या पायऱ्यांपासून ते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता करण्यासाठी प्रयत्न केले व मनापासून ते स्वच्छ देखील केले. यामध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने आणि मनापासून भाग घेतला. हे करत असताना येणाऱ्या जाणाऱ्या शिवभक्तांनी त्यांचे कौतुक देखील केले आणि ही कौतुकाची थाप मिळाल्यामुळे त्यांना आणखी उत्साह चढला. आणि शिवगर्जना देत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत आपल्या राजाच्या गडाची साफसफाई करायची आहे असा ध्यास मनामध्ये ठेवला आणि हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची जाणीव निर्माण होऊन सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होण्यास मदत झाली. सहभागी विद्यार्थ्यांनी भविष्यात अशा उपक्रमात पुन्हा सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.