डॉ. ऋतुजा विठ्ठल साळवे यांचे नीट – पीजी परीक्षेत उज्वल यश

। लोकजागर । फलटण । दि. ०१ मार्च २०२५ ।

वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या नीट – पीजी प्रवेश परीक्षा सन २०२४ मध्ये रावडी बु. (ता.फलटण) येथील डॉ. ऋतुजा विठ्ठल साळवे यांनी उज्वल यश संपादन करुन केंद्र सरकारच्या शासकीय कोट्यातून डी.जी.ओ. (स्त्रीरोग तज्ज्ञ) पदवीस प्रवेश मिळवला आहे. या यशाबद्दल डॉ. ऋतुजा यांचा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सत्कार करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. ऋतुजा यांच्या सत्काराप्रसंगी फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव बोंद्रे, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव जगताप, खराडेवाडीचे माजी सरपंच रविंद्र टिळेकर, तुषार नाईक निंबाळकर, अमोल बोबडे, विठ्ठल साळवे आदींची उपस्थिती होती.

डॉ. ऋतुजा साळवे या रावडी बु. येथील सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा रावडी बु. येथे झाले आहे. नंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे घेतले. सन 2018 मध्ये त्यांनी नीट – युजी प्रवेश परीक्षेत उज्वल यश संपादन करुन महाराष्ट्र शासनाच्या कोट्यातून सोलापूर येथील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथून एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केली. आता सन २०२४ च्या नीट – पीजी परीक्षेत पुन्हा एकदा त्या यशस्वी ठरल्या असून त्यांनी डी.जी.ओ. (स्त्रीरोग तज्ज्ञ) पदवीस प्रवेश मिळवला आहे.

Spread the love