महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य चळवळीतील नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जिंती नाका, फलटण येथील स्मारकाची झालेली दुरावस्था.
। लोकजागर । फलटण । दि. 0८ मार्च २०२५।
फलटण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या जिंती नाका येथे देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी स्व.वेणुताई चव्हाण यांचा संयुक्त पुतळा असून सदर पुतळा व सभोवताली असणार्या संरक्षक भिंतीची पडझड होऊन दुरावस्था झालेली आहे. सदर परिसराची दुरावस्था दूर करुन याठिकाणी सुशोभीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने फलटण नगरपालिकेला निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय काँग्रेस चे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या सुचनेनुसार फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष पंकज पवार यांनी फलटण नगरपरिषद चे उपमुख्याधिकारी तेजस पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव लोखंडे व फलटण शहर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अल्ताफ पठाण उपस्थित होते

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय काँग्रेस फलटणच्या वतीने प्रशासनास अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाबाबतची निवेदने दिलेली आहेत. वास्तविक फलटण हे स्व.वेणुताई चव्हाण यांचे माहेर असून समस्त फलटण वासियांना याचा अभिमान आहे. येत्या १२ मार्च २०२५ रोजी स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांची जयंती असते. यावेळी फलटण तालुक्यातील अनेक संस्था, नागरिक अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यावेळी स्मारक परिसराची झालेली पडझड तसेच तेथे असलेला कचरा व गुटखा व मद्याच्या रिकाम्या बाटल्या यामुळे सदर स्मारकाची दुरावस्था पाहून सर्वांचे मन व्यथित होते. वरील सर्व परिस्थीती पाहता आपण याची दखल घ्यावी व सदर स्मारकाची व संरक्षक भिंतीचे तातडीने सुशोभीकरण करावे.
फलटण शहरातून होणार्या वाहतुकीचे वाढते प्रमाण पाहता बारामती पुल ते श्रीराम कारखाना मार्गे मार्केट यार्डकडे जाणार्या रस्त्याचा वापर होणेसाठी वाहतूक वळवणे आवश्यक आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे सिग्नल यंत्रणा बसवलेली आहे मात्र ती अनेक वर्षे बंद अवस्थेत असल्याने रोजच वाहतूकीची कोंडी होत असते. त्यातच काही अवजड वाहने चुकीच्या बाजूने वळण घेत असतात. यातच एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे या ठिकाणची तातडीने सिग्नल यंत्रणा चालू करावी. शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर नवीन व्यापारी संकुल झालेली असून सदर व्यापारी संकुलात पार्किंग नाही. त्यामुळे तेथील दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावर आपली वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी.तसेच फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून फलटणकर नागरिकांना सुविधा मिळणेबाबत संबंधित विभागांना आपल्या माध्यमातून योग्य सुचना द्याव्यात, फलटण शहराच्या संबंधित याही मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.