उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

नवीन महायुती सरकारचा पहिला तर अजित पवारांचा ११ वा अर्थसंकल्प

। लोकजागर । मुंबई । दि. १० मार्च २०२५ ।

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे आज १० रोजी राज्याचा वर्ष २०२५ – २६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा ११ वा अर्थसंकल्प असणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021 चा अर्थसंकल्प ८ मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी ११ मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा आहेत.

अजित पवार विक्रमाच्या वाटेवर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या त्यांचा ११ वा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (१३ वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (११) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील.

जयंत पाटील (१० वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (९ वेळा) अर्थसंकल्प सादर केला आहे.

Spread the love