। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२५ ।
येथील प्रसिद्ध लेखक ‘सर्ज्या’कार सुरेश शिंदे यांच्या पत्नी तथा पत्रकार विकास शिंदे यांच्या मातोश्री, लेखिका कै. सुलेखा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, किर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवार, दिनांक 12 मार्च 2025 रोजी करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम तांबमाळ (फलटण) येथील सुर्याजी गार्डन बँक्वेट हॉल येथे सकाळी 10 वाजलेपासून संपन्न होणार आहेत.

‘सुलेखा शिंदे : समाजसेविका ते कादंबरीकार’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून सुलेखा शिंदे यांच्यावरील ‘सुलेखा शिंदे : समाजसेविका ते कादंबरीकार’ या पुस्तकाचे प्रकाशन सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी बालवाडी, साखरशाळा, बिनभिंतीची शाळा, प्रौढ साक्षरता वर्ग अशा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातील सुलेखा शिंदे या पहिल्या शिक्षीका होत्या. शिवाय ‘मालकाचं खातं’, ‘साळवानाची खोप’, ‘लेखकाचं घर पेलताना’ या लक्षवेधी साहित्यकृतींसह विविध पुस्तके, लेख, व्याख्याने या माध्यमातून साहित्यक्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. त्यांच्या या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील कामावर प्रकाश टाकणारे लेख, साहित्यकृतींचे परिक्षण, कुटूंबातील व्यक्तींचे व स्नेहीजनांचे लेख आदींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा व सुलेखा प्रकाशन यांच्यावतीने ही साहित्यकृती प्रकाशित होणार आहे.

‘सुलेखा सुरेश शिंदे साहित्य संवाद पुरस्कारा’चे वितरण
कै. सुलेखा शिंदे यांच्या साहित्यिक कार्याची स्मृती जपण्याच्या उद्देशाने सुरेश शिंदे यांच्या कल्पनेतून ‘सुलेखा सुरेश शिंदे साहित्य संवाद पुरस्कार 2025’ चे वितरण या कार्यक्रमात अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचा हा पुरस्कार मलठण येथील सौ. नसीम कादर पठाण व फलटण येथील दिलीप जनार्दन पिसाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
फुलांचे किर्तन व पुष्पवृष्टी
कै. सुलेखा शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सकाळी 10 ते 12 या वेळेत फलटण तालुक्यातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. नवनाथ महाराज कोलवडकर यांचे फुलांचे किर्तन होणार असून दुपारी 12 : 05 वाजता पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी या भावपूर्ण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश शिंदे, विकास शिंदे, सौ. वैभवी शिंदे यांनी शिंदे व फुले परिवाराच्यावतीने केले आहे.