पहिल्या छायाचित्रात ‘मराठ्यांचे शस्त्रागार’ या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व अभिनेते शंतनु मोघे. दुसर्या छायाचित्रात बर्गे घराण्याची ऐतिहासिक शस्त्रे पाहिल्यानंतर शंतनु मोघे यांच्यासमवेत पोपटराव बर्गे.
। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२५ ।
क्षत्रिय मराठा बर्गे घराण्याचे ऐतिहासिक शस्त्र ‘गुर्ज’ पाहून हे घराणे हिंदवी स्वराज्यासाठी किती शक्ती आणि युक्तीने झुंजले असेल याची कल्पना येते, असे उद्गार प्रसिद्ध अभिनेते शंतनु मोघे यांनी काढले.

पुणे येथील बालगंधर्व कलादालनात सह्याद्री प्रतिष्ठान, हिदुस्थान यांच्यावतीने ‘मराठ्यांचे शस्त्रागार’ हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व प्रसिद्ध अभिनेते शंतनु मोघे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर प्रदर्शनाची पाहणी करताना बर्गे घराण्याच्या शस्त्रांची माहिती फलटण येथील इतिहास अभ्यासक पोपटराव बर्गे यांनी शंतनु मोघे यांना दिली. त्यावेळी ते बोलत होते.
शंतनु मोघे पुढे म्हणाले, ‘‘ या प्रदर्शनातील क्षत्रिय मराठा बर्गे घराण्याचे ऐतिहासिक शस्त्र गुर्ज हे शस्त्र शत्रूच्या अंगावरील लोखंडी चिलखत सहजपणे तोडू शकते. हे गुर्ज शस्त्र व क्षत्रिय मराठा बर्गे घराण्याचे पूर्वज हिंदस्वी स्वराज्यासाठी किती शक्ती, युक्तीने झुंजले असतील हे शस्त्र पाहून कळते. आपण हे ऐतिहासिक शस्त्र गुर्ज पाहून धन्य झालो. अशी अनेक प्रकारची गोल गुर्ज पाहिली आहेत. प्रदर्शनातील हे शस्त्र महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा आहे.’’
या शस्त्र प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्य निर्मितीच्या कार्यात लढणारे सरसेनापती, सरलष्कर, सुभेदार तसेच प्रमुख सरदारांच्या देव्हार्यातील शस्त्रे पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये श्रीमंत पवार, कंक, बर्गे, गरुड, शिरोळे, विंचूरकर, बावडेकर, पोतनीस, वरखडे, मोहिते, साबुसिंग पवार, खाडे, गोळे, इब्राहिम गारदी, जाधवराव, माने, बाबर, गाडे, बांदल, राजेशिर्के, डिंबळे, शितोळे, बारगर, गंधे आदी घराण्यांचा समावेश होता.

प्रदर्शनाच्या समारोपाच्या सत्रात बर्गे घराण्याचा सह्याद्री प्रतिष्ठानचे वतीने सत्कार करण्यात आला. हा सत्कार प्रियाताई बर्गे, पोपटराव बर्गे व शंभू उर्फ रोहित बग यांनी स्वीकारला.