। लोकजागर । सातारा । दि. १२ मार्च २०२५ ।
सर्व प्रकारची गुलामगिरी दूर करण्यासाठी, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी, अखिल समाजात समता आणि बंधुत्व निर्माण करण्यासाठीचे फुले दाम्पत्याचे कार्य देशाला प्रेरणा देणारे आहे, असे विचार रयत शिक्षण संस्थेच्या ऑडीट विभागाचे सहसचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ते बोलत होते. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता डॉ.आर.आर.साळुंखे, विद्यापीठ भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख, ज्युनियर विभाग उपप्राचार्य डॉ.गणेश पाटील, स्टाफ वेल्फेअर विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी पाटील, प्रा.संदीप भुजबळ, अधीक्षक तानाजी सपकाळ व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
सावित्रीबाई यांचे धैर्य,करुणा आणि नेतृत्व याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले ‘ ज्योतीराव यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व त्यांनी केले. त्या विचाराशी ठाम होत्या, १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ आली .या काळात यशवंत याने वैद्यकीय शिक्षण घेतले असल्याने प्लेग झालेल्या अनेकांना उपचारासाठी त्यांनी यशवंतकडे नेले. हे सेवा कार्य करत असताना या माऊलीला प्लेग झाला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सारे आयुष्य त्यांनी गरिबांच्या न्यायासाठी,हक्कासाठी,समाजाला शिक्षण देण्यासाठी समर्पित केले. सावित्रीबाई यांच्या कार्याचा वारसा,आपण जपला पाहिजे असे ते म्हणाले.