। लोकजागर । फलटण । दि. १३ मार्च २०२५ ।
फलटण तालुक्यातील तरडगाव प्राथमिक आरोग्यकेंद्र व गिरवी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन ब्रम्हचैतन्य मंगल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी निखिल डिघे तर अध्यक्षस्थानी तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल कदम व डॉ. वैभव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महिला कर्मचारी, ३५ आरोग्य सेविका, ३ समुदाय महिला अधिकारी, ४ गटप्रवर्तक, ८९ आशा स्वयंसेविका या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
डॉ. निखिल डिघे यांनी महिला विषयक अधिकार, कायदे,महिला संरक्षण, महिला आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.
डॉ अनिल कदम म्हणाले, महिलांनी कर्तुत्वान स्त्रियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दिलेल्या विचाराचे आचरण करणे आवश्यक आहे सावित्रीबाई फुले रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श प्रत्येक महिलेने ठेवला पाहिजे. प्रत्येक महिलेने स्वतः खंबीर उभे राहून महिलांच्या मदतीला धावून जाण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आज स्त्रिया कुठेही कमी नाहीत. गावच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती राज्यपाल पदावर महिला विराजमान आहेत. चुल मुल आणि चार भिंतीच्या आतील संसारच स्त्रिया पुर्वीच्या काळात करत होत्या मात्र आता त्याला फाटा देत सर्व क्षेत्रात महिला उच्च पदावर काम करताना दिसत आहेत.
महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट काम करणार्या महिला कर्मचार्यांचा यथोचित गुणगौरव व विशेष सत्कार करणेत आला.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती गुरव मॅडम यांनी केले.