स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढा; आम्ही कधीही तयार
। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।
‘‘माजी खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. परंतु कालच्या सहकार विभागाच्या आदेशात प्रशासक नियुक्तीचा कुठेही उल्लेख नाही. शासनाने केवळ निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारे प्रशासक नेमता येत नाही त्याबद्दल आम्हीही उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केलेली आहे. कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी त्यांनी कुटील डाव खेळला आहे’’, असा आरोप आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला.

श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन नितीन भोसले, संचालक संतोष खटके आदींची उपस्थिती होती.
‘‘प्रशासक नियुक्त झाला की काय अवस्था होते हे आपण नगरपालिकेत आज बघत आहोत. तेथील प्रशासक त्यांच्या मागे फिरुन त्यांनी सांगितलेली कायदेशीर – बेकायदेशीर कामे करत असतात. हीच परिस्थिती त्यांना श्रीराम कारखान्यात अप्रत्यक्षरित्या चुकीचे निर्णय घेवून आणायची आहे. पण त्यांचे हे कारस्थान आपण यशस्वी होऊ देणार नाही. प्रशासकीय दहशत कशी असते ? याचं उदाहरण हा फलटण तालुका आहे’’, असेही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘‘या कारखान्याला उर्जितावस्था येत असताना गेली 15 वर्षे विश्वासराव भोसले कुठे होते?,’’ असा सवाल करुन ‘‘इतर नेत्यांची नावे घेऊन तुम्ही कशाला निवडणूकीला सामोरे जाता. एकदा तरी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढा. आम्ही निवडणूकीसाठी सज्ज आहोत’’, असे आव्हानही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिले.
डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिले त्या चार मुद्यांना सविस्तर उत्तर
श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी विश्वासराव भोसले यांनी तक्रारीत नमूद केलेल्या चार मुद्यांना सविस्तर उत्तरे दिली. यावेळी बोलताना डॉ. शेंडे म्हणाले की, ‘‘आम्ही कारखान्याच्या एकूण 16,739 सभासदांची यादी निवडणूक अधिकार्यांकडे दिलेली होती. त्यांनतर मयत सभासदांबाबत हरकत घेण्यात आल्यानंतर 2,124 सभासदांची नावे करुन 14,615 सभासदांची यादी आम्ही सादर केली. ती यादी त्यांनी मान्य केली आहे. सन 2002 पासून ते आजपर्यंत जवळ 2,000 हजार मयत सभासदांची वारस नोंद आम्ही केलेली आहे. प्रत्येक वार्षिक सभेत आम्ही वारसनोंदीबाबत आवाहन केले होते.’’
‘‘सभासदाचे कमीत कमी 20 गुंठे क्षेत्र असावे तेव्हा तो सभासद होऊ शकतो, असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. सन 2002 पासून आम्ही केलेले सभासद त्यांचे 7/12 घेवून केलेले आहेत. या नियमाची कुठेही आम्ही पायमल्ली केलेली नाही. सभासदत्व मिळाल्यानंतर काहींचे क्षेत्र वारसांकडे गेले असेल किंवा काहींनी आपले क्षेत्र विकले असल्याची काही उदाहरणे असू शकतील. मात्र सभासदत्व देताना आपण 7/12 ची खात्री केलेली आहे’’, असेही डॉ. शेंडे यांनी स्पष्ट केले.
‘‘सभासदत्वासाठी 15 हजार रुपयांचा शेअर्स भरण्याचा नियम झाल्यानंतर ज्यांची शेअर्सची रक्कम कमी आहे ती भरुन घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. परंतु प्रत्येकाला ही रक्कम भरणे शक्य नव्हते. तेव्हा सभासदाच्या ऊसाच्या पेमेंटमधून ही रक्कम पूर्ण करुन घेण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र सभासदांनी त्याला विरोध करुन टप्प्याटप्प्याने थोडी थोडी रक्कम वजा करुन शेअर्सची रक्कम पूर्ण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दिनांक 1/1/2023 पर्यंत 79 सभासदांचे 15 हजार शेअर्स पूर्ण आहेत’’, असेही डॉ. शेंडे यांनी सांगितले.
‘‘पाच वर्षातून एकदा तरी ऊस घातला पाहिजे. बरेच लोक श्रीराम कडे नोंद करतात पण आपला ऊस लवकरात लवकर जावा या उद्देशाने अन्यत्र ऊस घातला जातो. पण जास्तीत जास्त सभासदांनी श्रीरामला ऊस घातलेला आहे’’, असे स्पष्ट करुन ‘‘त्यांच्या हरकतीप्रमाणे आम्ही गेलो असतो तर फक्त 79 सभासदांची यादी आम्ही दिली असती. मात्र मतदानास पात्र असणार्या सभासदांचीच यादी आम्ही निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दिलेली आहे. ती त्यांनी मंजूरही केलेली आहे. त्यामुळे आम्ही फक्त 79 लोकांचीच यादी पाठवली आहे आणि तेव्हढेच मतदान करणार असा गैरसमज कुणीही करु नये. शासनाच्या कालच्या आदेशातही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे असे नमूद केले आहे. या आदेशात प्रशासक नियुक्तीचा कुठलाही उल्लेख नाही’’, असेही डॉ. शेंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखाना उभारणीपासूनचा इतिहास सविस्तर विषद केला.