महाआरोग्य शिबीरातून गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न : डॉ. विश्‍वनाथ चव्हाण

वाठार स्टेशन येथे आयोजित महाआरोग्य शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

। लोकजागर । वाठार स्टेशन । दि. १८ मार्च २०२५ ।

‘‘उत्तर कोरेगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमच्या टीमचे परम कर्तव्य आहे. चव्हाणवाडी (ता.फलटण) हे जसे माझे गाव आहे तसेच येथील विखळे हे सुद्धा मी माझेच गाव मी समजतो; कारण ते माझ्या वडिलांचे आजोळ आहे. या आरोग्य महामेळाव्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून माझ्या सर्वच टीमला खूप आनंद झाला आहे. भविष्यातही असे आरोग्य महामेळावे समर्थ वागदेव महाराजांच्या पावनभूमीत आयोजित करून तळागाळातील गरजूंना मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. नागरिकांनी आता आपल्या आजारांपासून स्वतःला मुक्त करून शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर बनून नवी पिढी घडवायची आहे’’, असे प्रतिपादन डॉ. विश्‍वनाथ चव्हाण यांनी केले.

उत्तर कोरेगाव परिसरातील सुप्रसिद्ध बाजारपेठ वाठार स्टेशन आणि परिसरातील 15 गावांचे एकत्रित महाआरोग्य शिबिर नुकतेच येथील श्री वागदेव विद्यालयात संपन्न झाले. एमबीबीएस, एमडी मेडिसिन, डिप्लोमा इन इकार्डियोग्राफी शिक्षण घेतलेले, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर शिबीरात नागरिकांच्या मोफत प्राथमिक आरोग्य तपासण्या, मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी अचूक माहिती मिळाली.

आरोग्य महामेळाव्याचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी डॉ. चव्हाण आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले. अशा शिबीरांमुळे आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते. सध्या धान्य काढणीच्या कामांमुळे काही नागरिकांना उपस्थित राहता आले नाही तरी भविष्यात तज्ञ डॉक्टरांच्या बहुमूल्य वेळेचा उपयोग उपयुक्त सामाजिक आरोग्य महामेळाव्यांमधून नक्कीच होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, सदर शिबीरात सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव (आदित्य हॉस्पिटल, पोवई नाका, सातारा) यांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी 65% सवलतीत पॅप स्मिअर तपासणीची सुविधा दिली. मात्र, महिलांचा सहभाग आणखी वाढवता आला असता, असे त्यांनी सांगितले. महिलांनी आता गर्भाशय संबंधित समस्यांना आपल्या तज्ञांशी सल्लामसलत करून निवारण करायचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉ. अण्णासाहेब कदम (कदम स्कीन क्लिनिक) यांनी नागरिकांना अशा आरोग्य महामेळाव्यात सहभागी होण्याचे महत्त्व सांगितले. अशा तपासण्यांमुळे आजारांची तीव्रता वाढण्यापूर्वीच त्यांना वेळीच रोखता येईल. डॉ. चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे उत्तर कोरेगाव परिसरातील लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्वचा रोग व केसांच्या निगडीत आजारांपासून मुक्त होण्याकरिता सातारा जिल्ह्यातील आधुनिक तंत्रज्ञान कदम स्कीन क्लिनिक येथे उपलब्ध आहे, त्याचा नागरिकांनी सवलतीत जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व श्री. गणेश चव्हाण यांनी वाठार स्टेशन परिसरातील लोकांना अशा उच्चशिक्षित तज्ञांच्या ज्ञानकौशल्य अनुभवाचा निश्चितच भविष्यात फायदा होणार आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व डॉक्टरांचा सत्कार व अभिनंदन केले.

प्रारंभी महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन वाठार स्टेशनच्या सरपंच सौ. सीमा चव्हाण आणि गणेश चव्हाण, महेश गांधी, अभिजीत निकम यांनी तज्ञांसह दीपप्रज्वलन करून केले. एमक्यूअर फार्माचे हेड मॅनेजर अमोल बारटक्के, टेरिटरी मॅनेजर मोहम्मद अली मुलाणी, एमजे फार्माचे मॅनेजर इरफान शेख, सिप्ला फार्माचे हेड मॅनेजर वैभव पवार, मॅनेजर अभिजीत शिंदे, युनिडस् हेल्थकेअर फार्माचे सोमनाथ माने आणि सौ. शीतल पवार (वाठार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी क्लिनिक व्यवस्थापक) यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि रुग्ण उपस्थित होते.

Spread the love