। लोकजागर । फलटण । दि. २० मार्च २०२५ ।
मौजे टाकळवाडे (ता.फलटण) येथील विस्तारीत गावठाण जमिनीची पुन्हा शासकीय मोजणी करुन हद्दीच्या खुणा निश्चित करण्यात याव्यात. तसेच या ठिकाणी झालेले अतिक्रम हटवून जागा व रस्ता मोकळा करण्यात यावा व ज्या ग्रामस्थांना तिथे जागा मिळायला हवी त्यांना ती देण्यात यावी या मागणीचे निवेदन टाकळवाडे ग्रामस्थांनी फलटणचे तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव यांना दिले.

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मौजे टाकळवाडे (ता.फलटण) येथील गट नंबर 339, क्षेत्र 8 हे. 88 आर या गायरान जमीनीतील 2 हे. 40 आर जमीन गावठाण विस्तार योजनेसाठी सूचविण्यात आली होती. त्यानुसार सदर जमीन अप्पर जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील आदेश क्र. मह.अ/4/गाव/कावि/747, दि. 4/2/1997 अन्वये शासनाकडे वर्ग करुन मौजे टाकळवाडे येथील गावठाण विस्तार योजनेसाठी अभिहस्तांकित केली.सदर गावठाण योजनेसाठी अभिहस्तांकित केलेली 2 हे 40 आर जमीन तालुका निरीक्षक, भूमी अभिलेख, फलटण यांचे मार्फत मोजणी करुन सदर जमीनीचे 1 ते 90 असे भूखंड पाडण्यात आले होते व आहेत. त्यापैकी 39 भूखंडावर गावातील ग्रामस्थांची नोंद लागलेली असून त्यातील काहींचे 7/12 निघत असून काहींचे निघत नाही. ज्यांचे 7/12 निघत नाहीत त्यांना सदरची जमीन अल्प दराने देवून त्यांची नोंद 7/12 सदरी घेण्यात यावी.
उर्वरित 51 भूखंडावरती व रस्त्यावरती बेकायदेशीर अतिक्रमण झाले असून हे अतिक्रमण काढून त्याठिकाणी गावातील ज्यांना घरकुले मंजुर झाली आहेत पण जागेअभावी ती प्रलंबित आहेत अशांना जागा देण्यात यावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, प्रदीप नलवडे, रियाज पठाण, साहिल शेख, भाऊसो चव्हाण, नानासो फुले, किरण भोसले, संतोष मिंड यांच्या सह्या आहेत.