अखेर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार ‘श्रीराम’ कारखान्यावर प्रशासकीय राजवट

प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती; सत्ताधार्‍यांना मोठा धक्का

। लोकजागर । फलटण । दि. २१ मार्च २०२५ ।

बहुचर्चित श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर अखेर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीनुसार प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली असून फलटणच्या प्रांताधिकारी श्रीमती प्रियांका आंबेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी काल दिनांक २० रोजी सदरचा आदेश जारी केला आहे. कारखाना निवडणुकीसंदर्भात माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या सुरू असलेल्या लढ्याला हे मोठे यश मानले जात असून दरम्यान, कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या श्रीराम कारखान्याच्या निवडणूकीपूर्वी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वातील सत्ताधारी गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपुष्टात आलेली आहे. विश्‍वासराव भोसले यांनी कारखाना निवडणूकीच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असल्याने शासनाने निवडणूक पुढे ढकलली आहे. माजी संसद सदस्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदर निवडणूक कायदेशीर व पारदर्शी होण्यासाठी प्रशासक नियुक्तीची विनंती केलेली आहे. त्यामुळे ज्याअर्थी कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे आणि कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मतदार यादीबाबत तक्रार आणि उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात होणारी निवडणूक ही निष्पक्ष व पारदर्शीपणे होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी नेमणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत पुणे विभागीय प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी फलटण उपविभागीय अधिकारी श्रीमती प्र्रियांका आंबेकर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश जारी केला आहे.

आ. श्रीमंत रामराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गत काही दिवसांपूर्वी श्रीराम कारखान्यावर प्रशासक नियुक्तीच्या मागणीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या मागणीला कडक शब्दात विरोध दर्शवला होता. संभाव्य प्रशासक नियुक्ती विरोधात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते. कारखान्यावर प्रशासक नेमण्याचा विरोधकांचा कुटील डाव असल्याचा आरोपही आ. श्रीमंत रामराजे यांनी केला होता. तथापि; आता कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर ते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांचे झुकते माप कुणाला ?

राज्याचे सहकार खाते उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. सुरुवातीला श्रीराम कारखाना निवडणूकीचा स्थगितीचा निर्णय व आता प्रशासक नियुक्तीचा निर्णय यावरुन ना. अजितदादा पवार फलटणच्या राजकारणात कुणाला झुकते माप देत आहेत याबाबतही उलट – सुलट चर्चा या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर रंगताना दिसत आहेत.

Spread the love