। लोकजागर । फलटण । दि. २२ मार्च २०२५ ।
‘‘श्रीराम कारखान्याचं चांगलं होईलं की वाटोळं होईल हे भविष्यकाळ ठरवेल. गेल्या ३० वर्षात तुम्ही श्रीराम कारखान्याचं काय चांगलं केलं ? ते तुम्ही सांगा. मी श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळात जाणार नाही. तालुक्यातील तरुण पिढी हुशार आहे. फलटण तालुक्यातल्या शेतकर्यांवर व त्यांच्या मुलांच्या कर्तृत्त्वावर माझा विश्वास आहे. हा कारखाना गोरगरीब सभासदांच्या मालकीचा आहे. तो त्यांच्या हितासाठी चालला पाहिजे. त्यांच्या हिताच्या आड मी कधीही येणार नाही. मला खात्री आहे सभासदांची पोरं श्रीराम कारखाना चांगला चालवतील’’, असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

श्रीराम कारखान्यावर प्रशासक नियुक्तीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, अॅड. नरसिंह निकम आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘‘श्रीराम कारखाना भाड्याने दिल्यानंतर भाडे वाढवायच्या ऐवजी कमी केले गेले, कारखान्याच्या जमीनी विकल्या गेल्या आणि कर्ज कमी होण्याऐवजी कर्जात असणारा हा कारखाना आहे, अशा भ्रष्टाचारावर राजू शेट्टी यांनी बोलावं. शासनाने मयत सभासदांच्या नोंदीकरता कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक केली आहे. तालुक्याने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली आहे. कारखान्याचे शोषण करुन त्यात दमडीही शिल्लक ठेवली नाही. सभासदांचे हक्क गेले तरीही त्यांनी दखल घेतली नाही. प्रशासक नेमून सभासदांना त्यांचे हक्क द्यावे लागत आहेत; ही दुर्दैवी परिस्थिती राजू शेट्टी यांनी लक्षात घ्यावी’’, असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी प्रशासक नियुक्तीवरुन केलेल्या टिकेला उत्तर देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
आ. श्रीमंत रामराजे यांनी शिक्षणाला उद्देशून सोशल मिडीयाच्या माध्यमातून केलेल्या टिकेला उत्तर देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, ‘‘गेल्या ३० वर्षात फलटणला बारामतीच्या पुढं नाही पण निदान बरोबर जरी तुम्ही घेऊन जाऊ शकला असता तर शिक्षणावर आधारीत तुमचा पराक्रम आम्ही मान्य केला असता. दूध संघ भंगारात जमा झाला आहे, श्रीराम सहकारी साखर कारखाना हा शोषून शोषून आवाडेंच्या ताब्यात दिला आहे, मालोजीराजे बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावून त्याची चौकशी केली. खरेदी – विक्री संघ अस्तित्वातून गायब केला आहे, मार्केट कमिटीमध्ये गाळेधारकांच्या तक्रारी आहेत, ६ महिन्यापासून पगार थकीत आहेत. त्यामुळं त्यांनी दुसर्यांच्या संस्थांवर बोलण्याआधी स्वत:च्या संस्थांकडं बघावं’’, असा टोला लगावतं “आता खोटं विकलं जाणार नाही. तुमचे पराक्रम सर्वसामान्यांना समजले आहेत. तुम्ही भाड्यानं दिलेलं पाणी मी माघारी आणलं आहे”, अशीही टिका यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
यावेळी श्रीराम कारखान्याच्या कारभाराविरोधात व न्यायालयीन लढ्याबाबत श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, विश्वासराव भोसले, अॅड. नरसिंह निकम यांनी भूमिका स्पष्ट केली. प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी कारखान्याची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाने पॅनेल स्थापन करुन लढण्याचा स्पष्ट मनोदय व्यक्त केला.