‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रमाचा शुभारंभ करताना दिलीपसिंह भोसले. दुसर्या छायाचित्रात रक्तदात्यांना प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देताना रणजितसिंह भोसले.
बलिदान मास निमित्त श्री शिवप्रतिष्ठानचा ‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रम संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ ।
‘‘छत्रपती संभाजी महाराजांचं महत्त्व, त्यांचं चरित्र लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु आहे. या कार्यात असलेला युवकांचा सहभाग कौतुकास्पद आहे’’, असे गौरवोद्गार श्री सदगुरु व महाराजा संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, फलटण विभाग यांच्यावतीने ‘रक्तदान महायज्ञ’ हा रक्तदान शिबीराचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या शिबीराचे उद्घाटन दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराजा मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष रणजितसिंह भोसले, भाजपचे अमोल सस्ते, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिलीपसिंह भोसले पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वी या प्रतिष्ठानच्या मार्फत श्री सद्गुरु शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी लाठी-काठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. याही वर्षी अशा शिबीराचे आयोजन त्यांनी करावे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार घडवणे महत्त्वाचे असून ते काम आज श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण व्हावी, चांगले शिक्षण मिळावं, चांगले संस्कार घडावेत यासाठी श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात सुरु असलेले काम अभिनंदनीय आहे. इतक्या भव्य स्वरुपात रक्तदान शिबीर आयोजित करणे हे काम सोपे नसून रक्तदान शिबीराचा हा उपक्रम दिवसेंदिवस असाच वाढत जावा. या उपक्रमासाठी आम्ही सदैव श्री शिवप्रतिष्ठानच्या पाठीशी राहू’’, अशी ग्वाहीही दिलीपसिंह भोसले यांनी यावेळी दिली.
प्रारंभी दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने ‘रक्तदान महायज्ञ’ शिबीराचा शुभारंभ संपन्न झाला. सदरच्या ‘रक्तदान महायज्ञ’ उपक्रमास फलटणकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फलटण तालुक्यातील तब्बल ७०९ लोकांनी या शिबीरात सहभागी होवून रक्तदान केले. बलिदान मासानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरामधील पश्चिम महाराष्ट्रातील हा रक्तदानाचा सर्वाधिक आकडा असल्याचे धारकर्यांकडून सांगण्यात आले. रक्तदान शिबीरातील रक्तदात्यांना प्रोत्साहन पर भेट म्हणून शिवकथाकार विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ हे शिवचिरित्र देण्यात आले.
रक्तदान शिबीरस्थळी ऐतिहासिक पुस्तक प्रदर्शन व विक्री उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, गॅलेक्सी को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालिका सौ. सुजाता यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आदींनी भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले.