। लोकजागर । फलटण । दि. २५ मार्च २०२५ ।
फलटण तालुक्यातील राज्यशासनाकडून आखण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत ‘सुकर जीवनमान’ उपक्रमाच्या अनुषंगाने जमिनीसंबंधीच्या नोंदी, तुकडा शेरे, रस्ते सुरु करणे, तगाई बोजा कमी करणे याबाबतची कार्यवाही मंडल अधिकारी आणि तलाठी यांचेमार्फत करुन घ्यावी, असे आवाहन फलटणचे तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वारे केले आहे.

डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, शासनाच्या ‘सुकर जीवनमान’ उपक्रमामध्ये सातारा जिल्हाधिकारी यांनी विविध विषय समाविष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामध्ये 8 ऑगस्ट 2023 च्या शासन अधिसुचनेनुसार निर्धारीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे वगळता उर्वरीत 7/12 वरील ‘तुकडा’ शेरा कमी करणे, एकत्र कुटूंब मॅनेजर नोंदी कमी करणेबाबत, वारस नोंदी करणे, लक्ष्मी मुक्ती योजना राबविणे, गावनकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद रस्ते, पांदण रस्ते, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाणेचा पायमार्ग लोकसहभागाद्वारे मोकळे करणे तसेच अतिक्रमणमुक्त करणे, फलटण तालुक्यामध्ये 18 वर्षे पूर्ण केलेल्या खातेदारांच्या नावासमोरील अज्ञान पालक कर्ता नोंद कमी करणे, तसेच विविध शासन निर्णयास अनुसरुन 31 डिसेंबर 1988 पूर्वीचे तगाई बोजे कमी करणे, दि. 24/11/1989 पूर्वीचे बंडींग बोजे कमी करणे, तसेच भू – विकास बँकेचे इतर हक्कातील बोजे कमी करणे या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी महसूल मंडल अधिकारी आणि आपले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेशी संपर्क साधून या कामांबाबतची कार्यवाही पूर्ण करुन घ्यावी.
‘लक्ष्मी मुक्ती योजने’ अंतर्गत पुरुष खातेदारांनी स्वेच्छेने विनंती करुन व फेरफार नोंदीबाबतची प्रक्रिया करुन 7/12 उतार्यावर आपल्या नावासोबत आपल्या कायदेशीर पत्नीचे नाव घेऊन महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यास मदत करावी, असे आवाहनही महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले असल्याचे तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, फलटण तालुक्यात 1 जानेवारी 2025 पासून आजवर केेलेल्या कार्यवाहीनुसार निर्धारीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे वगळता उर्वरीत 7/12 वरील ‘तुकडा’ शेरा कमी केलेल्या प्रकरणांची संख्या 6,696 इतकी असून एकुमॅ नोंदी कमी करणे जमीनगट संख्या 262, वारस नोंदी करणे जमीन गट संख्या 593 इतके कामकाज फलटण तालुक्यात झाले असल्याचेही, तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.