पिंपरदच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचा डीजे व फटाकामुक्त जयंतीचा निर्णय सर्वोत्तम : स.पो.नि.शिवाजी जायपात्रे

। लोकजागर । फलटण । दि. २७ मार्च २०२५ ।

दारू पिऊन डीजेवर नाचणारी मुले कोणत्याही पालकांना आवडत नाहीत. मात्र महापुरुषांचे विचार रुजवणारी जयंती सर्वांनाच आवडते. पिंपरदच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाने निवडलेला डीजे व फटाकामुक्त जयंतीचा निर्णय हा सर्वोत्तम आहे. अशा प्रकारे सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी झाल्या तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नच निर्माण होणार नाही”, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे म्हणाले. ते पिंपरद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाच्या “भीम जयंती २०२५” च्या नियोजन बैठकीत बोलत होते.

यावेळी हायस्कूल कमिटी अध्यक्ष जनार्दन भगत , जेष्ठ नेते बाळासाहेब कापसे, माजी उपसरपंच अनिल ढमाळ, ग्रामपंचायत सदस्य विकास ढमाळ, पोलीस पाटील सुनील बोराटे, फलटण तालुका सुतार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव सुतार, संजय लाळगे, शरद मोरे, मंडळाचे सल्लागार सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना स.पो.नि.शिवाजी जायपात्रे म्हणाले, “अनेक गावांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. त्यामुळे जाती – धर्मामध्ये तेढ निर्माण होत आहे. श्रेयवादाच्या लढाईची सुरुवात ही महापुरुषांच्या जयंती पासूनच सुरु होते. श्रेयवादाच्या लढायातून डीजे संस्कृती पुढे आली आहे. एखाद्या महापुरुषाच्या जयंतीला डीजे फटाके वाजले की अन्य महापुरुषांच्या जयंतीला सुद्धा त्यापेक्षा जास्त फटाके, डीजे वाजवला जातो. त्यावेळी समाजामध्ये तेढ निर्माण होतो”, असे जायपात्रे म्हणाले.

“प्रत्येक जाती धर्मातील लोकांना आपापले महापुरुष प्रिय असतात आणि ते असलेही पाहिजेत. परंतु इतर महापुरुषांचे विचार सुद्धा सर्व समाजासाठी आहेत हा विचार आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत महापुरुषांची जयंती सर्व समावेशक होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सर्व जाती धर्मासाठी आहे. ते देशांमध्ये नव्हे तर जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. सर्व जाती-धर्मांनी विचार केला की बाबासाहेबांनी लिहिलेल संविधान हे आपल्यासाठी आहे त्यावेळी त्यांची जयंती सर्वसामावेशक होईल आणि दुसऱ्या धर्मातील लोकही सहकार्य करतील”, असा आशावाद यावेळी जायपात्रे यांनी व्यक्त केला.

“जयंती साजरी करताना कर्ण कर्कश डीजे, लेझर लाईट यामुळे जेष्ठ नागरिक यांना त्रास होणार, काही दारू पिऊन नाचणार, अश्लील हातवारे करणार त्यामुळे इतर समाजातील सुज्ञ नागरिक अशा प्रकारच्या जयंती पासून दूर राहतात. परंतु पिंपरद सारखी पारंपरिक पद्धतीची जयंती साजरी झाल्याने विविध जाती धर्मातील लोकांना सुद्धा अशा जयंती मध्ये सहभागी व्हावेसे वाटते “,असे गौरवोद्गार जायपात्रे यांनी काढले. तर “पिंपरद सारखी पारंपारिक जयंती सर्व ठिकाणी होणे गरजेचे असल्याचेही”, यावेळी जायपात्रे यांनी निदर्शनास आणून दिले.

“बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती – धर्मातील महिलांना चार भिंतीच्या बाहेर आणून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम केले आहे हे आजही अनेक महिलांना माहिती नाही. जयंती मंडळानी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे काम सर्व समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे”, असेही मत जायपत्रे यांनी व्यक्त केले.

“सामाजिक उपक्रम राबवत असताना केवळ एकजाती धर्मासाठी न राबवता तो व्यापक स्वरूपात राबवला पाहिजे. जयंती मंडळानी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे”, असेही जायपत्रे यांनी शेवटी सांगितले.

प्रस्ताविकामध्ये सचिन मोरे यांनी डीजे व फटाकेमुक्त जयंती बरोबरच पारंपरिक वाद्य व पारंपरिक खेळ हे या वर्षीच्या जयंतीचे प्रमुख आकर्षण असणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जनार्दन भगत, अनिल ढमाळ यांनी आपले विचार व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत निरज मोरे, विकास मोरे, विक्रांत मोरे, अमित खुडे, संतोष मोहिते, बापूराव मोरे,दयानंद मोरे, विजय बनसोडे यांनी केले.

Spread the love