विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबरोबर कौशल्यावर आधारित कोर्स करावेत : प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे

। लोकजागर । लोणंद । दि. ०१ एप्रिल २०२५ ।

‘‘शरदचंद्र पवार महाविद्यालयाने अनेक नामवंत व्यक्ती घडवल्या आहेत. जगामध्ये विविध संधी आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. परकीय भाषा शिकून त्यामध्ये प्रभुत्व मिळवलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे आहे त्याचबरोबर कौशल्यावर आधारित अनेक कोर्स आहेत ते करावेत आणि त्यातून आत्मनिर्भर व्हावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा लक्ष दिले पाहिजे’’, असे प्रतिपादन एस. एम. जोशी कॉलेज हडपसरचे प्राचार्य डॉ. एस. टी. साळुंखे यांनी केले.

लोणंद येथील रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे शैक्षणिक वर्ष 2024- 25 या वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिल्लारे होते. व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य हनुमंतराव शेळके पाटील, प्रा. डॉ. संजय अहिवळे, उपप्राचार्य बी. डी. जाधव, उपप्राचार्य भीमराव काकडे, क्रीडा संचालक प्रा. संकेत नालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिल्लारे म्हणाले, ‘‘प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवंत, किर्तीवंत आणि यशवंत व्हावे म्हणून आजचा वार्षिक पारितोषिक वितरण हा सोहळा आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर व्यासपीठावर आणि वर्गातील सर्व गोष्टींमध्ये नैपुण्य मिळवले पाहिजे. माणसाने सतत आशावादी असले पाहिजे. महाविद्यालयाची प्रगती ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अवलंबून असते.’’

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील, सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि अभिवादन करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. क्रीडा विभागाचे अहवाल वाचन प्रा. संकेत नालकर यांनी केले. सांस्कृतिक विभागाचे अहवाल वाचन प्रा. एम. डी. नायकु यांनी केले. शैक्षणिक अहवालाचे वाचन उपप्राचार्य बी. डी. जाधव यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय जिमखाना समितीचे सदस्य आर. जे. नाळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. डी. नायकु व प्रा. सौ. छाया सकटे यांनी केले. मान्यवरांचे आभार जिमखाना समितीचे सदस्य प्रा. संजय डांगे यांनी मानले. या समारंभाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Spread the love