राजश्री रखमाजी सुभानजी बर्गे यांच्या स्वराज्य सेवेबद्दल ५ एप्रिल बर्गे सरदार घराण्यासाठी संस्मरणीय दिवस : पांडुरंग सुतार

। लोकजागर । फलटण । दि. ०५ एप्रिल २०२५ ।

‘‘कोरेगांवचे बर्गे सरदार घराणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्य सेवेत अग्रणी होते. बर्गे घराण्याची स्वराज्य निष्ठा सिद्ध करणारी एक ऐतिहासिक घटना ३३६ वर्षांपूर्वी रायगडावर घडली होती. सरदार राजश्री रखमाजी सुभानजी बर्गे यांनी छत्रपती राजाराम महाराजांची या दिवशी केलेल्या एकनिष्ठ सेवेमुळे हा दिवस सरदार बर्गे घराण्यासाठी विशेष संस्मरणीय ठरतो’’, अशी माहिती कोरेगांव (जि.सातारा) येथील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व मोडी लिपीचे तज्ज्ञ पांडुरंग सुतार यांनी दिली.

५ एप्रिल १६८९ रोजी घडलेल्या या घटनेबद्दल बारामती येथील इतिहास अभ्यासक अ‍ॅड. विशाल बर्गे यांच्या माध्यमातून एक ऐतिहासिक दस्तऐवज पांडुरंग सुतार यांच्या पाहण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर या ऐतिहासिक प्रसंगाविषयी पांडुरंग सुतार यांनी ‘लोकजागर’ला सविस्तर माहिती दिली.

पांडुरंग सुतार यांनी सांगितले की, ‘‘छत्रपती संभाजी महाराजांना ३ / ४ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वरहून कैद करुन औरंगजेबासमोर उभे करण्यात आले. त्यामुळे १२ फेब्रुवारी १६८९ ला छत्रपती राजाराम महाराजांना मंचकी बसविण्यात आले. त्यानंतर ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठी बलिदान झाले. २५ मार्च १६८९ ला झुल्फीकारखानाने रायगडास वेढा घातला. राजघराण्यातील सर्वांनी एकाच ठिकाणी राहण्यापेक्षा रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि राणी येसूबाईंच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी रायगड लढवावा असे सर्वानुमते ठरले.’’

पांडुरंग सुतार यांनी पुढे सांगितले की, ‘‘त्यानंतर ठरल्याप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज, रामचंद्रपंत आमात्य वावडेकर, प्रल्हाद निराजी प्रतिनिधी, शंकराजी नारायण, खंडो बल्लाळ चिटणीस, बहिरजी घोरपडे, रुपाजी भोसले असे अनेक सरदार ५ एप्रिल 1689 रोजी रायगडावरुन प्रतापगडाकडे गेले. तेथून पुढे १५ नोव्हेंबर १६८९ रोजी ते खडतर प्रवास करुन जिंजीस पोचले. त्यावेळी त्यांचेसोबत रखमाजी सुभानजी बर्गे व त्यांचेच भावकीतील शिलेदार जानकोजी बर्गे व संताजी बर्गे हे आपल्या कुटूंब कबिल्यासह जिंजीस पोहोचले होते. त्यामुळे भिषण परिस्थितीत दिलेल्या या स्वराज्य सेवेमुळे ५ एप्रिल हा दिवस सरदार बर्गे घराण्यासाठी संस्मरणीय ठरतो.’’

‘‘सेनापती संताजी घोरपडे यांच्यासमवेत असणारे कोरेगांवच्या बर्गे घराण्यातील सरदार सुभानजी मेंगोजी बर्गे यांचे रखमाजी बर्गे हे ज्येष्ठ सुपुत्र होते. अ‍ॅड. विशाल बर्गे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या १६९३ मधील सनदेनुसार छत्रपती राजाराम महाराजांची केलेल्या एकनिष्ठ सेवेबद्दल त्यांनी सेनापती संताजी घोरपडे यांच्या शिफारशीनंतर रखमाजी बर्गे यांना अर्धाचावर जिरायत भूमी कसबे कोरेगावी इनाम दिली होती. पुढे सन १८३० मध्ये रखमाजींचे पणतू पाटलोजी बापूजी बर्गे यांना कुरणाची चौकशी दरम्यान ते ईनामपत्र सापडले नाही. त्यामुळे ती ईनाम जमीन जप्त झाली. ते कुरण पुन्हा मिळविणेसाठी १८३३ साली त्यांनी केलेल्या अर्जामध्ये ‘रखमाजी चंदीस कैलासवासी राजाराम महाराज छत्रपती याज बरोबर गेले होते. त्यास ईनाम जमीन अर्धाचाहूर दिली’, असाही उल्लेख आढळतो’’, असेही पांडुरंग सुतार यांनी निदर्शनास आणून दिले.

‘‘रखमाजी बर्गे हे जिंजीस छत्रपती राजाराम महाराजांच्या सेवेत राहिले. ते पुन्हा मुळगावी कोरेगावला परतले नाहीत. तेथेच हे सर्वजण स्वराज्य रक्षणाच्या कार्यात कार्यरत राहिले. त्यामुळे कोरेगावातील वंशवळीत यांचे खाली ‘परागंदा’ असे नमूद केले आहे’’, असेही पांडुरंग सुतार यांनी सांगितले.

Spread the love