विहीरीत पडलेल्या रानगव्याला जीवदान; तरडफ येथील घटना

। लोकजागर । फलटण । दि. ६ एप्रिल २०२५ ।

तरडफ (ता.फलटण) येथे नर जातीचा रानगवा हा वन्य प्राणी विहिरीमध्ये पडलेल्या अवस्थेत आढळून आला. वन विभाग, नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी फलटण, रेस्क्यु बारामती या संस्था व ग्रामस्थांच्या सहकार्‍याने या रानगव्याला क्रेनच्या सहाय्याने विहीरीबाहेर काढून जीवदान देण्यात यश आले.

रान गवा तरडफ येथील विहीरीत पडला असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन खात्याशी संपर्क साधला. यावेळी वन विभाग, नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी – फलटण, रेस्क्यु बारामती या संस्था तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या वन्यप्राण्याला विहीरीमधून सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. या रानगव्याचे अंदाजे 1 टन वजन होते. त्यानंतर वनखात्यातील वैद्यकीय अधिकारी व वन विभागाच्या अन्य अधिकार्‍यांच्या निरीक्षणामध्ये तपासणी करुन या रानगव्याला मुक्त करण्यात आले.

दरम्यान, अशा प्रकारे वन्यजीव जखमी किंवा विहीरीमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण या संस्थेची 02166226979 अथवा 7588532023 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love