शिवभक्तांनी पुढाकार घेवून संतोषगडाची उपेक्षा थांबवावी : रविंद्र बेडकिहाळ

। लोकजागर । फलटण । दि. २९ एप्रिल २०२५ ।

‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यशाली पराक्रमाची फलटण तालुक्यातली एकमेव गौरवशाली स्मृती म्हणजे संतोषगड आहे. पण हा गड अद्यापही दुर्लक्षित व उपेक्षितच राहिला आहे. धूमधडाक्यात, प्रचंड रोषणाई, नेत्रदीपक मिरवणूक, अनेक शिवकालीन देखावे, फटाक्यांची आतषबाजी यामध्ये शिवछत्रपतींची जयंती साजरी करणार्‍या शिवभक्तांनी पुढाकार घेवून आता तरी या संतोषगडाची उपेक्षा थांबवावी’’, अशी अपेक्षा इतिहासप्रेमी, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये व्यक्त केली आहे.

‘‘फलटण तालुक्यात दरवर्षी काही लाखो रुपये खर्च करुन शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणावर सर्वच राजकीय पक्ष, विविध तरुण मंडळे अत्यंत उत्साहाने करीत असतात. परंतु ह्यातील काही खर्च संतोषगडाच्या विकासासाठी दिल्यास नव्या पिढीसमोर हा गड शिवकालीन वैभवाची साक्ष म्हणून आदर्श होईल’’, असे मत व्यक्त करुन बेडकिहाळ आपल्या पत्रकात नमूद करतात, ‘‘हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1662 मध्ये आदिलशाहीच्या मुलुखावर नजर ठेवण्यासाठी बांधला होता. सन 1665 मध्ये हा गड देखरेखीसाठी फलटणचे राजे बजाजीराव नाईक निंबाळकर यांच्याकडे होता. नंतर पुरंदरच्या तहानुसार हा गड मोगलांच्या ताब्यात गेला होता. तर काही काळ पुन्हा विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. अखेर सन 1673 मध्ये पुन्हा हा गड शिवाजी महाराजांनी परत घेतला. सन 1812 मध्ये पेशवाई बरखास्त झाल्यानंतर हा गड ब्रिटीशांच्या ताब्यात आला आणि नंतर आता सध्या महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याच्या ताब्यात हा गड आहे.’’

‘‘डॉ. पतंगराव कदम वनमंत्री असताना आम्ही सन 2008 पासून या गडाच्या विकासासाठी शिवचरित्राचे अभ्यासक पोपटराव बर्गे यांच्या सहकार्याने व ताथवडा ग्रामपंचायत, युवक मंडळ, गडावरील साध्वी माताजी यांच्या विनंतीनुसार वन खात्यातर्फे हा गड निसर्ग पर्यटन केंद्र व्हावा यासाठी प्रयत्न सुरु केले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आमच्या व ताथवडा ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी या गडास पर्यटन क्षेत्रातील ‘क’ वर्गाचा दर्जा दिला व रुपये 10 लाखाचे अनुदान जिल्हाधिकारी यांनी निसर्ग पर्यटनासाठी दिले. त्यातून वनखात्याने गडाच्या पायथ्यापर्यंतचा रस्ता, पायवाटेने चढताना दुतर्फा विद्युत खांब व निसर्गफलक लावले. त्यानंतर आजपर्यंत जिल्हा प्रशासनाने व जिल्हा वनखात्याने येथे काहीही विकासकाम केले नाही. राज्यशासन व पर्यटन, सांस्कृतिक विभाग गडकोट किल्ल्याच्या संरक्षणासाठी, विकासासाठी व तिथे पर्यटनस्थळ होण्यासाठी कोट्यावधीचा निधी देत आहे. तरीही हा गड मात्र अद्याप उपेक्षितच राहिला आहे,’’ अशी खंत बेडकिहाळ यांनी व्यक्त केली आहे.

‘‘या गडाच्या डाव्या बाजूला उंचच उंच असा काळ्याकभिन्न दगडांचा कडा आहे व खाली मोकळी भरपूर जागा आहे. तिथे उत्तमप्रकारे तरुणांना साहसी पर्यटन ट्रेकिंग करता येईल. सध्या अनेक सुविधा नसतानाही काही गिर्यारोहणप्रेमी तिथे ट्रेकिंगला येत आहेत. गडाच्या वरच्या बाजूला सुमारे 3 एकराचे विस्तीर्ण पठार आहे व येथे भन्नाट वारा वाहत आहे. इथे पर्यटकांना तंबू, निरीक्षण मनोरे, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह, निसर्ग पायवाट, पर्यटन माहिती केंद्र (गडाच्या पायथ्याशी), तसेच वन्यप्राणी, पक्षी, गडाची माहिती सचित्र फलक लावले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठीत असा पुतळा, फलटण तालुक्याच्या इतिहासाचे व शिवशाहीचे दर्शन पर्यटकांना होण्यासाठी या पठारावर छोटेखानी शिवसृष्टी दालनही झाले पाहिजे, अशी अनेक शिवभक्तांची मागणी आहे. त्यानुसार तसेच सांस्कृतिक व धार्मिकदृष्टीने प्राचीन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या महिषासुर मर्दिनीचे येथे सुंदर मूर्ती असलेले मंदिर, तातोबाचे मंदिर, अद्भूतरम्य अशा दोन मोठ्या गुहा व त्यामध्ये अदृष्य पाणवठा असलेली शिवकालीन तळी, श्री दत्तमंदिर याचाही विकास इथे होण्याची आवश्यकता” निदर्शनास आणून देत बेडकिहाळ यांनी पत्रकात नमूद केले आहे की, ‘‘आता तरी फलटणच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी राजकारणविरहित भावनेतून या ठिकाणी रु. 50 कोटीचे उत्तम पर्यटनस्थळ की जे फलटण, माण, खटाव व कोरेगांव तालुक्यातील लोकांना मध्यवर्ती असे राज्य व केंद्र शासनाकडून मंजूर करुन घ्यावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे वैभवशाली प्रतिक म्हणून या गडाचा विकास करावा अशी अपेक्षा आहे.’’

Spread the love