कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी सर्व पक्षीय प्रयत्न व्हावेत : खासदार धैर्यशील मोहिते – पाटील

। लोकजागर । फलटण । दि. ०८ मे २०२५ ।

खर्‍या अर्थाने आपल्या भागावर अन्याय होऊ द्यायचा नसेल तर सर्व पक्षीय नेते मंडळींनी एकत्र येवून कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प कसा पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत’’, अशी अपेक्षा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांनी फलटण येथे बोलताना व्यक्त केली.

खासदार मोहिते – पाटील यांनी काल फलटण तालुक्यातील मुंजवडी, आसु, पवारवाडी, गोखळी, विडणी येथे सदिच्छ भेट दौरा केला. त्यानंतर फलटण येथील शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.

खासदार मोहिते – पाटील पुढे म्हणाले, ‘‘कृष्णा – भिमा स्थिरीकरण प्रकल्पातून 6 जिल्हे आणि 31 तालुक्यांचा प्रश्‍न सुटणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यात पुढाकार घेतला आहे. पुराचे वाहून जाणारे पाणी आपल्या दुष्काळी भागाकडे कस वळवता येईल आणि पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा यातून इरिगेशन कसं पूर्ण करता येईल, याबाबत शासनाची सकारात्मकता दिसत आहे. यातून माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी गावे वंचित राहणार नाहीत आणि बागायत भागांचही काही हिरावलं जाणार नाही; यादृष्टीकोनातून आमचा प्रयत्न सुरु आहे.’’

फलटण – पंढरपूर रेल्वे बाबत बोलताना खासदार मोहिते – पाटील म्हणाले, ‘‘विजयसिंह मोहिते – पाटील या मतदारसंघाचे खासदार असताना देशाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभु होते. त्यावेळी झालेल्या शेवटच्या रेल्वे बजेटमध्ये सुरेश प्रभू यांनी फलटण ते पंढरपूर रेल्वेसाठी तरतूद केली. त्याची कामे आत्ता सुरु झालेली आहेत. याबाबतच्या सर्व संबंधित अधिकार्‍यांशी आपण सातत्याने संपर्कात आहोत. सध्याच्या घडीला निती आयोगाच्या शिफारशीने रेल्वे बोर्डाकडे सर्व्हेचा रिपोर्ट पाठवण्यात आलेला आहे’’; अशीही माहिती यावेळी खा. धैर्यशील मोहिते – पाटील यांनी यावेळी दिली.

‘‘फलटण तालुक्याच्या दौर्‍यादरम्यान विकासकामांची निवेदने अनेकांनी दिली. दोन्ही शासनाकडे पाठपुरावा करुन ही विकासकामे करुन घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. रेल्वेच्या सर्वेक्षणाबाबत व जागा अधिग्रहणाबाबत लोकांचे प्रश्‍न होते; त्याचेही आपण जागेवर निराकरण केले’’, असेही खासदार मोहिते – पाटील यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूर बाबत बोलताना ‘‘कारवाई करण्याबाबत एकमुखी पाठींबा सरकारला दिला होता. यातून आपला देश एक आहे हा संदेश आपण जगाला दिला. आपण केलेल्या हल्ल्यात नागरिकांना कुठलाही त्रास न देता आंतकवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करण्याचं काम सैन्य दलानी केलं आहे’’, असे सांगून सैन्य दलासह सरकारचेही खा. मोहिते – पाटील यांनी अभिनंदन केले.

Spread the love