। लोकजागर । फलटण । दि. 27 मे 2025 ।
निंभोरे, ता. फलटण येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सन 2003 – 04 च्या इयत्ता 10 वी च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. तब्बल 21 वर्षांनी शाळेचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आल्याने अनेक जुन्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

सदर मेळाव्यास विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विष्णुपंत फडतरे, दादासाहेब चोरमले, श्री. भुजबळ, सौ. ढमाळ, बजरंग गोडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विष्णुपंत फडतरे म्हणाले, ‘‘जुन्या आठवणींना उजाळा मिळणार्या अशा मेळाव्यातून एक आगळी वेगळी ऊर्जा प्राप्त होते.’’ ‘‘आपल्या व्यस्त आयुष्यात शालेय जीवनातील आठवणींना मिळणारा उजाळा आपल्याला खूप मोठा आनंद देवून जातो’’, असे दादासाहेब चोरमले यांनी सांगितले.
‘‘विद्यालयाच्या इमारतीत भरलेली आपली त्यावेळेची पहिलीच बॅच होती. विद्यालयाला अनेकांनी मोलाची मदत केली. या परिसरात त्यावेळी या बॅचने मोठी स्वच्छता मोहीम राबवली होती’’, या व अशा अनेक आठवणींना उजाळा देणारी भाषणे माजी विद्यार्थ्यांनी केली.
प्रारंभी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने उपस्थित शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत महाराज यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनीषा अडसूळ, शारदा अडसूळ, राजश्री यादव, विद्या नेवसे, सुशांत महाराज, निलेश रणवरे, सुधीर मोरे, मनोज कांबळे, लक्ष्मण लांडगे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.