। लोकजागर । फलटण । दि. 7 जून 2025 ।
सासकल, ता. फलटण येथे कृषि विभागामार्फत प्रगतशील शेतकरी बबन मुळीक यांच्या शेताच्या बांधावर आंबा झाडं लागवड करून 5 जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. नैसर्गिक शेती मिशन जनजागृती कार्यक्रमांतर्गत सदरचा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी विडणी मंडल कृषि अधिकारी शहाजी शिंदे यांच्या हस्ते झाडाचे रोपण करण्यात आले. यावेळी सेंद्रिय शेती तज्ञ जनार्दन अडसूळ, सहाय्यक कृषी अधिकारी सुनील निकम, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन आवारे, सहाय्यक कृषी अधिकारी सासकल तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव उपस्थित होते.

लोकांना पर्यावरणाचे महत्त्व आणि त्याची काळजी घेण्याची आवश्यकते बद्दल जाणीव करून देण्यासाठी देशभर झाडे लागवड कार्यक्रमात घेतला जातो. पर्यावरण आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे ते आपल्याला शुद्ध हवा पाणी आणि अन्न पुरवते. तसेच विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करते. प्रदूषणामुळे पर्यावरणाची गंभीर निर्माण समस्या निर्माण झाली आहे. हवा, पाणी आणि माती रासायनिक मिसळून त्यांचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे अनेक रोग आणि नैसर्गिक आपत्ती येताना दिसत आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण उपाय म्हणून वृक्षारोपण मोहीम व चळवळ उभी करून जास्तीत जास्त झाडे लावावीत. शेतकर्यांनी बांधावर तसेच अंगणामध्ये व प्रत्येक व्यक्तींनी झाडे लागवडीद्वारे प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्नशील राहावे, असे यावेळी सांगण्यात आले.

