प्रभागरचनेचा कालबद्ध कार्यक्रम जारी
। लोकजागर । फलटण । दि. 12 जून 2025 ।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकपूर्व कामांना गती येत असून शासनाकडून फलटण नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जारी करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमानुसार दि. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कार्यक्रमानुसार पालिका मुख्याधिकार्यांनी दिनांक 11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करायची आहे.
त्यानंतर मुख्याधिकार्यांनी प्रत्यक्ष प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरु करावयाचे असून दिनांक 17 ते 18 जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, दि. 19 ते 23 जून स्थळ पाहणी करणे, दि. 25 ते 26 जून गुगलमॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, दि. 27 ते 30 जून नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जावून तपासणे, दि. 1 ते 3 जुलै प्रारुप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षर्या करावयाच्या आहेत.

त्यानंतर मुख्याधिकार्यांनी दिनांक 4 ते 8 जुलै दरम्यान प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठवायचा आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकार्याने प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर दि. 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान प्रारुप प्रभाग रचना मुख्याधिकार्यांनी प्रसिद्ध करुन त्यावर हरकती सूचना मागवायच्या आहेत.

दि. 22 जुलै ते 31 जुलै दरम्यान जिल्हाधिकारी अथवा जिल्हाधिकार्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेतील.
दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेवून प्राधिकृत अधिकार्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना मुख्याधिकारी राज्य निवडणूक आयोगास मान्यतेस पाठवतील.
तद्नंतर राज्य निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेली प्रभाग रचना संबंधित मुख्याधिकार्यांना कळवतील व दि. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान मुख्याधिकारी राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करतील.
