लायन्स क्लबची समाजसेवेची परंपरा आजही कायम : रविंद्र बेडकिहाळ

आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात नवागतांचे स्वागत व अद्ययावत वर्गांचे उद्घाटन

। लोकजागर । फलटण । दि. 17 जून 2025 ।

‘‘फलटण लायन्स क्लबला समाजसेवेची मोठी परंपरा असून आत्ताच्या काळातही ही परंपरा क्लबच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लबचे युवा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते जगदीश करवा यांनी कायम ठेवली आहे’’, असे मत महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील नवागतांचे स्वागत व दोन वर्गांचे अंतर्गत सुशोभीकरण व डिजिटलायझेशनच्या उद्घाटनप्रसंगी बेडकीहाळ बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ सदस्य बापूसाहेब मोदी, प्राचार्य शांताराम आवटे, शालेय समितीचे चेअरमन रवींद्र बर्गे, सौ. अलका बेडकिहाळ, लायन बाळासाहेब भोंगळे, लायन मंगेशशेठ दोशी, लायन चंद्रकांत कदम यांची उपस्थिती होती.

बेडकीहाळ म्हणाले, ‘‘समाजात अनेक जण पैशाने श्रीमंत आहेत. मात्र पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा सामाजिक कार्याने गुणवंत व्हावे. लायन जगदीश करवा हे प्रथीत यश बांधकाम व्यवसायिक असून कृतिशील समाजसेवक आहेत. लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले असून त्यांच्या पाठबळावर अनेक कृतिशील कार्यक्रम सुरू आहेत. त्यांचे सहकार्य आमच्या संस्थेसाठी नेहमीच मिळत असून त्यांच्या माध्यमातून आज प्रशालेतील एका वर्गाचे अंतर्गत सजावट व डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगून असेच सहकार्य यापुढेही मिळावे’’, अशी अपेक्षा यावेळी बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.

रवींद्र बेडकीहाळ यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त प्राप्त देणगीतून एका वर्गाचे व लायन जगदीश करवा यांच्या माध्यमातून एका वर्गाचे अंतर्गत सजावट व डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाल्याबद्दल लायन जगदीश करवा व रवींद्र बेडकीहाळ यांचा प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवागतांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन नवीन वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर शेंडे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण खरात यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांनी केले.

कार्यक्रमास श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनिष निंबाळकर, चतुराबाई शिंदे बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा सोनवले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love