प्राचार्य संजय वेदपाठक, वसंत यादव व भाऊसाहेब कापसे यांनी निवृत्ती न घेता यापुढेही कार्यरत रहावे : श्रीमंत संजीवराजे

। लोकजागर । फलटण । दि. 02 जुलै 2025 ।

प्राचार्य संजय वेदपाठक हे विद्यादानाचे काम उत्तम करतात तथापि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जबाबदार्‍या त्यांनी उत्तम पद्धतीने पार पाडल्या आहेत. वसंत यादव यांनीही आपल्या क्षेत्रात उत्तम गुणवत्ता निर्माण करण्यासाठी घेतलेली मेहनत नावाजण्यासारखी आहे. जगन्नाथ तथा भाऊ कापसे यांनी शिक्षण संस्थेतील आपली जबाबदारी तर उत्तम पद्धतीने पार पाडली पण त्याचबरोबर आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणि त्यापूर्वीही आणि आत्ताही स्वीय सहाय्यक म्हणून पेललेली जबाबदारी निश्चितपणे त्यांच्या गुणवत्तेवर शिक्का मोर्तब करणारी आहे. विविध ठिकाणाहून आणि विविध क्षेत्रातून येणार्‍या लोकांच्या अडचणी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना अत्यंत शांत डोक्याने आणि संयमाने त्यांच्याशी बोलावे लागते त्यामध्ये भाऊ कापसे यांनी पार पाडलेली जबाबदारी कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच आज त्यांना केवळ फलटण तालुका नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा ओळखतो असे गौरवोद्गार व्यक्त करताना या तीनही व्यक्तींची शासकीय नियमाप्रमाणे सेवापुर्ती झाली असली तरी आगामी काळात त्यांना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कामातून निवृत्ती घेता येणार नाही किंबहुना यांनी आपल्या तीस-पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेप्रमाणे यापुढेही कार्यरत रहावे”, अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य संजय वेदपाठक, उपशिक्षक वसंत यादव आणि प्रयोगशाळा सहाय्यक जगन्नाथ तथा भाऊ कापसे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक चव्हाण होते. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शरदराव रणवरे, रणजीत निंबाळकर, कृषी व हॉर्टी महाविद्यालय प्राचार्य यु.डी.चव्हाण, एस.डी.निंबाळकर, श्रीराम कारखाना व्हा.चेअरमन नितीन भोसले, अंबालिका शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेशराव तावरे, श्रीराम कारखाना संचालक महादेवराव माने, मार्केट कमिटी संचालक निलेश कापसे, पंचायत समिती मा.सदस्य वामनराव यादव, जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, सुभाष भांबुरे, दादासाहेब चोरमले, शिंदेवाडीचे माजी सरपंच शंकरराव बर्गे, माजी नगरसेविका सौ.प्रगती कापसे, श्रीराम सोसायटी संचालक शाम कापसे, उद्योजक राजेंद्र कापसे यांच्यासह मालोजीराजे शिक्षण संकुलातील आजी माजी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक/शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना, “तीनही सेवानिवृत्तांना त्यांचे उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो, त्यांच्या कुटुंबांनाही उत्तम आरोग्य, सुख समाधान लाभो”, अशी प्रार्थना श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी प्रभू श्री राम चरणी केली.

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार दिपकराव चव्हाण यांनी, “मालोजीराजे शैक्षणिक संकुलातील शिक्षण हे व्यक्तिमत्व घडविणारे असून त्यासाठी येथील शिक्षकांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे”, असे सांगितले.

“सेवापुर्ती निमित्त सत्कार होत असलेले तीनही व्यक्तिमत्व दर्जेदार काम करणारी असल्याने सेवापुर्तीनंतरही त्यांची सेवा या संस्थेसाठी अखंडित मिळत राहील”, अशी अपेक्षा व्यक्त करीत प्राचार्य अरविंद निकम यांनी तीनही सत्कारमूर्तींचे कौतुक करुन त्यांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य आणि सुख समाधान लाभावे यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना केली.

यावेळी मनोज कदम, बाबासाहेब खरात यांची समायोजित भाषणे झाली. प्रारंभी उपप्राचार्य काळे सर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी विवेचन केले. समारोप व आभार प्रदर्शन दिवसे सर यांनी केले तर राजश्री शिंदे व शिल्पा इंगवले यांनी सूत्रसंचालन केले.

Spread the love