समता घरेलू कामगार संघटनेला पाठबळ देणार : खासदार धैर्यशील मोहिते पाटील

। लोकजागर । फलटण । दि. 04 जुलै 2025 ।

घरेलू कामगार संघटनेच्या सर्व सदस्यांना शासनाच्या सर्व योजनांचे लाभ मिळवून देणे त्याचबरोबर त्यांच्या मागण्या, प्रश्न समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण घरेलू कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. फलटण येथील समता घरेलू कामगार संघटना खऱ्या अर्थाने गरजू लोकांसाठी काम करीत आहे आणि त्यांना आमचे सदैव पाठबळ राहणार आहे”, अशी ग्वाही माढा लोकसभा मतदार संघांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.

समता घरेलू कामगार संघटना, फलटण यांच्यावतीने कोळकी ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे ‘आपला खासदार प्रतिबद्ध खासदार अभियान’ व घरेलू काम करणाऱ्या महिलांना ‘भांडी वाटप’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मासूम संस्था, पुणे च्या संयोजक जया नलगे, युवा संस्था मुंबई चे कार्यक्रम समन्वयक विजय खरात, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, समता घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा कल्पना मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

“घरेलू कामगारांचे जे प्रश्न, समस्या व मागण्या आहेत, त्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आपल्या अखत्यारीत ज्या ज्या समस्या, मागण्या व प्रश्न येतात त्याबाबत आपण निश्चितपणे केंद्र स्तरावर संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी बोलू व त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करु, वेळप्रसंगी सदर प्रश्न संसदेतही मांडू”, असेही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

“घरेलू कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे निश्चितपणे लक्ष घालतील व ते मार्गी लावतील”, असा विश्वास यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. “आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरेलू कामगार महिलांना समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत गोष्टी त्यांचे हक्क मिळावेत यासाठी आम्ही निश्चितपणे कार्यरत राहू”, अशी ग्वाही यावेळी दीपक चव्हाण यांनी दिली.

कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुस्तक प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर महिलांना भांडी वाटप करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कल्पना मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. आभार किरण कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास घरेलू काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Spread the love