फलटणला मुलींसाठी हॉकी मैदानाची निर्मिती करा : खा. धैर्यशील मोहिते पाटील

। लोकजागर । फलटण । दि. 19 जुलै 2025 ।

‘‘जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या क्रीडा संकुलांमध्ये सिंथेटिक ट्रॅक उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. ज्या तालुक्यात क्रीडा संकुल प्रस्तावित आहे तेथे क्रीडा संकूल उभारण्याची तात्काळ कार्यवाही करावी. फलटण येथे मुलींसाठी हॉकीच्या मैदानाची निर्मिती करावी’’, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) समितीचे सह अध्यक्ष तथा माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दिशा समितीचे बैठक संपन्न झाली. या सभेला खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध त्यांच्यासह दिशा समितीचे अशासकीय सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार मोहिते पाटील म्हणाले, विविध गावांचा सर्व्हे करुन जी निकष पूर्ण करीत आहे अशा गावांमध्ये नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावे त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला जाईल. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची माहिती तेथील लोकप्रतिनिधींना द्यावी. काम करीत असताना कामाचा दर्जाही चांगला ठेवावा. या योजनेअंतर्गत माण तालुक्यातील मंजूर असलेल्या कामांच्या आराखडे दाखवावे. पुसेगाव ते म्हसवड या महामार्गाचे काम काही ठिकाणी ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहेत. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी बैठका घ्याव्यात. तसेच या मार्गावरील पथदिवे सौर उर्जेवर घेण्याविषयी संबंधित ठेकेदाराला सांगावे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. सैनिकांना चांगले उपचार मोफत मिळावे यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशा सूचना करुन सर्वसामान्य नागरिकांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र शासनाकडे निधीचाही पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाहीही खासदार श्री. मोहिते पाटील यांनी यावेळी दिली.

शिरवळ ते कराड या राष्ट्रीय महामार्गावर व सर्व्हिस रोडवर पाणी साठत आहे, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून या महामार्गावर व सर्व्हिस रोडवर पाणी साठणार नाही अशा पद्धतीने काम करावे. थोर पुरुषांच्या पुतळ्यासमोर व स्मारकांसमोर विविध आशयाचे फ्लेक्स लावले जातात, ही बाब अत्यंत चुकीची आहे. या ठिकाणी फ्लेक्स लावण्यास जिल्ह्यात बंदी करावी. तसेच जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा उपलब्ध होईपर्यंत जिल्ह्यातील खेळाडूंना सैनिक स्कूलचे मैदान सरावासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना खासदार नितीन पाटील यांनी केल्या.

जिल्ह्यातील गरजू नागरिकांना मोफत उपचार मिळावे यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आणण्यात येणार आहेत. कातकरी समाज हा विविध सोयी-सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. त्यांना प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत विविध सोयी-सुविधा देण्यात येत आहेत. काही कातकरी समाजातील कुटुंबांना घरकुले मंजूर झाली आहेत , परंतु जागेअभावी त्यांचे काम थांबले आहे. दिशा समितीच्या अशासकीय सदस्यांनी गावांमध्ये जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, शासन जागा खरेदी करेल. तसेच दिशा समितीच्या अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यांवर प्रशासन काम करेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

दिशा समितीच्या बैठकीमध्ये समितीच्या अशासकीय सदस्यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सूचना केल्या.

Spread the love