फलटण ते आदमापूर एस.टी. बस सुरु करण्याची मागणी

। लोकजागर । फलटण । दि. २५ जुलै २०२५ |

फलटण तालुक्यात संत सदगुरु बाळूमामा यांचे भक्त मोठ्या संख्येने असून त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने फलटण ते आदमापूर एस. टी. बस सुरु करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

फलटण आगाराकडे याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, फलटण तालुक्यातील अनेक भाविक भक्त श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी जात असतात. अशा भाविक भक्तांची संख्या जास्त असून आदमापूर येथे जाण्यासाठी त्यांची सद्यस्थितीत गैरसोय होत आहे. त्यामुळे फलटण आगारातून फलटण – आदमापूर बस सेवा सुरु झाल्यास फलटणसह बारामती, माळशिरस, माण तालुक्यातील भाविकही या बसने प्रवास करु शकतील. त्यामुळे ही बस लवकरात लवकर सुरु व्हावी.

सदर निवेदन देतेवेळी रासपचे सातारा जिल्हा प्रमुख संतोष ठोंबरे, फलटण कोरेगाव विधानसभा अध्यक्ष रमेश चव्हाण, तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ, ज्येष्ठ नेते माणिक मामा लोखंडे यांच्यासह निलेश लांडगे, रामदास केंगार, नितीन सुळ, अक्षय चोपडे, वैभवराज नरुटे, रमेश जाधव, सुनील दडस, प्रवीण भंडलकर, प्रविण काकडे, वैभव अहिवळे, रत्नाकर क्षीरसागर, तानाजी बरकडे, दत्तात्रय ननवरे, विनय ननवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.

Spread the love