नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर व आकांक्षा क्लासेसचा पुढाकार
| लोकजागर | फलटण | दि. २८ जुलै २०२५ |
येथील नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर व आकांक्षा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चायना मांजा जनजागृतीपर रॅली’चे आयोजन करण्यात आले होते.

नागपंचमी हा सण फलटण शहर व तालुक्यात पर्यावरण पूरक अशा पद्धतीने सर्वत्र साजरा होत असतो. याचबरोबर युवावर्ग पतंग उडविण्याचा आपला पारंपारिक छंद जपत असतो. मात्र अलीकडच्या काळात पतंग उडवताना वापरण्यात येणारा चायना मांजा हा मानव जातीला व पशु पक्षाला घातक ठरत असून यामुळे अनेक वेळा लोकांना तसेच पक्षांना जीव गमवावे लागलेले आहेत. याबाबतीत जनजागृती म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

फलटण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, माजी प्राचार्य सुधीर इंगळे, आकांक्षा क्लासेसचे सर्वेसर्वा संजय जाधव, तसेच नेचर अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
रॅलीमध्ये बहुसंख्येने मुले व मुली सहभागी झाल्या होत्या. यावेळी “आभाळ आहे पक्षांचे; नाही चायना मांजाचे”, “एक पतंग आकाशात; हजारो पक्षी धोक्यात”, “बंद करा बंद करा; चायना मांजा बंद करा” अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत होत्या.

मुधोजी हायस्कूल येथून सुरू झालेली हि रॅली गजानन चौक – महात्मा फुले चौक – डेक्कन चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून फिरून पुन्हा या रॅलीची सांगता मुधोजी हायस्कूल येथे करण्यात आली.
यावेळी बोलताना प्राचार्य सुधीर इंगळे म्हणाले चायना मांजा हा पर्यावरणासाठी तसेच वन्यजीव प्राण्यासाठी घातक असून यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील होऊ शकते. तसेच
चायना मांजाचे लवकर विघटन होत नाही. त्यामुळे तो पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे. अलीकडे शासनाने देखील चायना मांजाचा वापर करण्यावर बंदी आणलेली आहे. म्हणून चायना मांजा कोणीही वापरू नका. चायना मांजा वापरत असताना आढळून आल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. चायना मांजा किती घातक आहे व त्याचे होणारे गंभीर परिणाम या सर्व बाबींची माहिती सर्वांच्या समोर जावी या हेतूने आकांक्षा क्लासेस व नेचर अँड वाइल्ड वेल्फेअर यांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे ही शेवटी त्यांनी सांगितले.